आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनुन्याचे पोलिस पाटील अन् तलाठीही निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जनुना (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे नुकसान झालेल्या गारपीटग्रस्तांना वगळून नुकसान न झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक लाभ मिळवून दिल्याप्रकरणी कोतवालपाठोपाठ पोलिस पाटील नितीन बाळकृष्ण देशमुख व तलाठी के. एस. गाठे यांना निलंबित करण्यात आले आहे.

गावातील या भ्रष्टाचाराविरुद्ध ‘व्हिसल ब्लोअर’ तरुण शेतकर्‍यांनी आवाज उठवल्यानंतर ‘दिव्य मराठी’ने याचा सतत पाठपुरावा केला. याप्रकरणी तहसीलदारांनी केलेल्या चौकशी अहवालात सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषी सहायक दोषी आढळले होते. दरम्यान, सरपंच व कृषी सहायकावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जनुना येथे मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीने नुकसान झाले होते. याबाबत तलाठी, कृषी सहायक या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सर्वेक्षणही केले होते; परंतु ज्या शेतकर्‍यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले होते, त्यांची नावे सरपंच, पोलिस पाटील, कोतवाल यांच्या सांगण्यावरून कृषी सहायक व तलाठ्याने वगळून टाकले होते. ज्या शेतकर्‍यांच्या शेतात संत्र्याचे झाडही नसताना कोरडवाहू शेतीला प्रशासकीय यंत्रणेने नुकसानभरपाईचा लाभ मिळवून दिल्याची तक्रार गावातील ‘व्हिसल ब्लोअर’ तरुण शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी जनुना येथे दोन दिवस प्रकरणाची सखोल चौकशी करून सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषी सहायक या प्रकरणी दोषी असून तलाठ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा अहवाल उपविभागीय अधिकार्‍यांना सादर केला होता. यावरून तलाठी गाठे व पोलिस पाटील देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. खर्‍या लाभार्थींना वंचित ठेवून बोगस लाभार्थ्यांना मदतीचा लाभ मिळवून देऊन शासकीय रकमेचा अपहार करणे, शासनाला खोटे अहवाल सादर करणे, खोटे दस्तावेज देणे, पेरेपत्रकाच्या खोट्या नोंदी करणे आदी गंभीर ठपका ठेवून गाठे व देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाअधिकारी गाठे यांचा निलंबनाचा आदेश 10 जुलैला तर देशमुख यांच्या निलंबनाचा आदेश 15 जुलैला काढला आहे.

तालुका कृषी अधिकार्‍यांनाही पत्र : तांत्रिक जबाबदारी कृषी सहायकाची असल्यामुळे खोटे क्षेत्र दाखविल्यामुळे त्यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे असे पत्र तहसिलदारांनी तालुका कृषी अधिकार्‍यांनाही बजावले आहे.
सरपंच, कृषी सहायकावर कारवाई कधी?
तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सखोल चौकशी करून सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषी सहायक या प्रकरणी दोषी असल्याचा अहवाल उपविभागीय अधिकार्‍यांना सादर केला होता. यांपैकी पोलिस पाटील, तलाठी व कोतवालावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परंतु याप्रकरणी सारखेच दोषी असलेल्या कृषी सहायक व सरपंचावर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने शेतकर्‍यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, दोघांनाही त्वरित निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
घटनाक्रम असा
० शेतकर्‍यांनी 12 मे रोजी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली.
० 5 जूनला जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली तक्रार.
० 9 व 10 जून रोजी तहसीलदारांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली.
० 13 जून रोजी तहसीलदारांनी चौकशी अहवाल सादर केला.
० 2 जुलै रोजी कृषी सहायक प्रमोद सावरकर यांना निलंबित करण्याचे पत्र तहसीलदारांनी कृषी अधिकार्‍यांना दिले.
० 4 जुलै रोजी कोतवाल रोशन अरुण ठाकरे यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले.
० 5 जुलै रोजी तलाठ्याला कारणे दाखवा नोटिस.
० 10 जुलै रोजी तलाठी के. एस. गाठे यांच्या निलंबनाचे आदेश.
० 15 जुलै रोजी पोलिस पाटील नितीन देशमुख यांच्या निलंबनाचे आदेश.