आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई प्रवेश अर्ज भरण्यास सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - देशभरातील इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या ‘जॉइंट इंजिनिअरिंग एक्झाम’साठी (जेईई) ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत सहा जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचे (सीबीएसई) सहसचिव राजबीर सिंग यांनी हे परिपत्रक काढले आहे.
मध्य प्रदेश सरकारने इंजिनिअरिंग प्रवेशासाठी जेईई परीक्षेच्या माध्यमातूनच गुणवत्ता यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी सीबीएसईला प्रवेश अर्जाची मुदत वाढवण्याची विनंती केली होती. जेईईच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे केवळ एका राज्यासाठी प्रवेश सुरू ठेवणे शक्य नव्हते. परिणामी, सीबीएसईने सरसकट सर्वांसाठीच प्रवेश अर्ज भरण्याला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, आता सहा जानेवारी 2014 पर्यंत परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
क्रेडिट, डेबिटसाठी कर द्यावा लागणार
परीक्षेचे शुल्क क्रेडिट किंवा डेबिट कार्डने भरण्याची सुविधाही सीबीएसईने उपलब्ध करून दिली आहे; परंतु त्यासाठी कर मोजावा लागेल. क्रेडिट कार्डाने परीक्षा शुल्क भरल्यानंतर 1.20 टक्के सेवाकर लागेल. दोन हजार रुपयांपर्यंतचा शुल्क भरणा करण्यासाठी डेबिट कार्डावर 0.75 टक्के सेवाकर लागेल. दोन हजारांवरील शुल्कासाठी डेबिट कार्डावर एक टक्का सेवाकर लागेल.