आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्पा कांबळे यांना नोकरी देण्याची डीएसओंची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘राष्ट्रीय जेतेपद मिळवणार्‍या कबड्डीपटूच्या नशिबी मजुरी’ या मथळ्याखाली दै. ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल शहरातील नामांकित खेळाडू, संघटना संस्थांसोबतच आता शासकीय अधिकार्‍यांनीही घेतली आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी पाच राष्ट्रीय विजेतेपदं मिळवणार्‍या गरीब कबड्डीपटू पुष्पा कांबळे यांना त्यांच्याच तालुक्यात मानधनावर क्रीडा मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करणार्‍या खेळाडूला क्रीडा मार्गदर्शक म्हणून नियुक्त करता येते. प्रत्येक तालुक्यात यासाठी दोन पदं असतात. त्यांपैकी एका पदावर माजी राष्ट्रीय कबड्डीपटू पुष्पा कांबळे यांची नियुक्ती करू, असे जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांनी सांगितले. याआधी एचव्हीपीएम प्रधान सचिव प्रभाकर वैद्य यांनीही पुष्पा कांबळे यांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले असून, जिल्हा विदर्भ हौशी कबड्डी संघटनेच्या सचिवांनीही त्यांना विविध स्पर्धांमध्ये पंचगिरी दिली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. एवढेच नव्हे, तर नेहमीच मातीतील खेळ कबड्डीचा प्रचार प्रसार करणारे, कबड्डीपटू घडवणारे युवक क्रीडा मंडळही पुष्पा कांबळे यांचा सत्कार करून रोख मदतही देणार आहे. कांबळे यांनी ९० च्या दशकात देशभरातील कबड्डी स्पर्धा गाजवल्या. मात्र, सध्या त्यांना कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे जळका हिरापूर येथे शेतात मजुरी करावी लागते.

गरजू खेळाडूला मदत
राष्ट्रीय कबड्डीपटूला डीएसओ मदत करू शकतात. यासाठी त्यांनी अर्ज, प्रमाणपत्र आणि काही कागदपत्रे आमच्याकडे सादर करावीत. आम्ही त्यांना तालुक्यात क्रीडा मार्गदर्शक म्हणून नियुक्त करू शकतो. - अविनाशपुंड, डीएसओ, अमरावती जिल्हा.