आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KG To PG : Sports Education Compulsary In Primary School

केजी ते पीजी: प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा शिक्षणाची सक्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शाळांमधील विविध क्रीडा स्पर्धांना शारीरिक शिक्षणाचा आयाम देण्याची पद्धत बाद करण्याच्या दृष्टीने क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या अभ्यासक्रम समितीने हालचाली सुरू केल्या आहेत. मनोरंजनात्मक खेळांच्या माध्यमातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य कायम राखले जाणार आहे. त्यासाठी प्राथमिक शाळेत क्रीडा शिक्षण सक्तीचे करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी सातवीपर्यंतच्या प्रत्येक वर्गासाठी शारीरिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल.


क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या अभ्यासक्रम समितीने विद्यार्थ्यांच्या प्रमाणानुसार क्रीडा शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मांडला आहे. एखाद्या वर्गाच्या सहापेक्षा अधिक तुकड्या असल्यास दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. त्यासाठी सध्या शाळेत असलेल्या काही शिक्षकांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याविषयी सरकारने एक समिती स्थापन केली असून त्यात इंदू मजुमदार, मुकेश कोहली, गौरव होरा, राजन लुथर व डॉ. अरुण खोडस्कर यांचा समावेश आहे.


पाचवीपर्यंत स्पर्धेला स्थान नाही
प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक खेळातून क्रीडा शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. पाचवीपर्यंत स्पर्धेला स्थान दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढावी, शिस्तीचे पालन त्यांनी करावे तसेच बौद्धिक, नैतिक व शारीरिक विकासाच्या दृष्टीने अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच खेळाबाबतही आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रत्येक खेळाचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावे, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे समितीचे म्हणणे आहे.


सहावीपासून योगा
नव्या निर्णयानुसार सहाव्या वर्गापासून योगाचा समावेश क्रीडा शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. त्याचे वेळापत्रकसुद्धा तयार करण्यात आले आहे. त्याचा निश्चितच फायदा होईल.


घातक पायंडा : खोडस्कर
क्रीडा स्पर्धा म्हणजेच शारीरिक शिक्षण असा घातक पायंडा सध्या पाडला जात आहे. हा अतिशय धोकादायक प्रकार आहे. तो दूर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे अभ्यासक्रम समितीचे सदस्य डॉ. अरुण खोडस्कर यांनी सांगितले.