अमरावती - कृषी विभागाच्या जिल्ह्यातील सात फळ रोपवाटिकेत रोजंदारीने काम करणार्या मजुरांचे अंदाजे 45 लाखांवरील मजुरी शासनाने वर्षभरापासून थकवल्यामुळे त्यांच्यापुढे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. .वर्षभर पाठपुरावा करूनही कृषी विभागाकडून दाद मिळत नसल्याने या मजुरांनी अखेर विभागीय आयुक्तांकडून तरी न्याय मिळेल, या आशेने त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे विशेष म्हणजे, कृषी आयुक्तालयानेही वरिष्ठ अधिकार्यांच्या पाठपुराव्याच्या पत्रांना केराची टोपली दाखवली. कृषी अधीक्षक कार्यालयातील फळ रोपवाटिकेतील काही मजुरांनी ‘दिव्य मराठी’कडे आपल्या व्यथा मांडल्या.
त्यातील प्रातिनिधिक स्वरूपाच्या या प्रतिक्रिया.
कर्मचारीही झाले कर्जबाजारी
फळ रोपवाटिकेतील मजुरांचे चुकारे करता करता संबंधित कर्मचारीच कर्जबाजारी झाले आहेत. काहींनी सोने गहाण ठेवले, तर कुणी व्याजाने पैसे काढले. या कर्जबाजारीपणामुळे त्यांच्या कुटुंबातच कलह निर्माण झाला आहे.
दवाखाना पाहू, की पोराचं शिक्षण करू ?
मंगलाबाई पराये मागील बारा वर्षांपासून अमरावती येथील कृषी अधीक्षक कार्यालयातील फळ रोपवाटिकेत मजूर म्हणून काम करतात. त्यांचे पती सतत आजारी असतात. मुलगा आकाश बीड येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. मुलाला जेवण व इतर खर्च असे दरमहा साडेतीन हजार रुपये लागतात. त्यांच्या घरी कमावणारे मंगलाबाई यांचे केवळ दोन हात. पती कधी कधी हातमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी हातभार लावतात; परंतु वर्षभरापासून मजुरीच न मिळाल्यामुळे मुलाचे शिक्षण, पतीचे आजारपण व दररोजचा गाडा ओढण्यासाठी लागणार्या पैशांमुळे त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या आहेत. ‘दररोजच्या भाकरीसाठी उसनवार, महिना भरला की पोराचे पैसे की पतीचे आजारपण, काय पाहू नेमके’ हा मंगलाबाईंचा सवाल आहे.
- मंगला पराये
छायाचित्र - कृषी अधीक्षक कार्यालयातील फळ रोपवाटिकेत काम करणार्या काही मजुरांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यथा मांडल्या.