आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील मुलींच्या म्युझिक बँडने केले पब्लिकला ‘क्रेझी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सध्या सर्वच क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत. संगीत क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवायला विदर्भातील मुलींचा पहिला म्युझिक बँड तयार झाला आहे. ‘मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा..’ म्हणत सुरांनी नादावलेल्या पाच जणी एकत्र आल्या आणि म्युझिक बँड स्थापन झाला. त्यासाठी पुढाकार घेतला स्वर मोगर्‍याने आसमंत भारावून टाकणारी कनका गडकरी आणि गिटारच्या तारांनी रसिकांच्या हृदयात गाणे पेरणारी पल्लवी केदार यांनी..

संगीताचा वारसा कनकाला घरूनच मिळाला आहे. तिचे वडील डॉ. दत्ता हरकरे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार आहेत. त्यामुळे सुरांच्या हिंदोळय़ावर झोके घेत कनका मोठी झाली. एक दिवस घरी गुणगुणत असताना तिच्या मनात मुलींच्या रॉक बँडची कल्पना चमकली. तिने ती वडिलांना सांगितली आणि त्यांनीही ती उचलून धरली. तिथून मग सहकार्‍यांचा शोध सुरू झाला. व्यवसायाने अभियंता असलेली नेहा बापट, एमबीए करत असलेली धनर्शी मूठमारे, दंततज्ज्ञ डॉ. पौर्णिमा केदार एका सुरात बांधले गेले. स्वत: कनकाने कर्करोगावर संशोधन केले आहे, तर पल्लवी दहावीत आहे.

पल्लवी लीड गिटारीस्ट आहे, धनर्शी तबला वाजवते, कनका गाते आणि डॉ. पौर्णिमा केदार निवेदन करतात. नेहा बापटही गिटारिस्ट आहे. अजून ड्रमर आणि की-बोर्डवर मुलगी मिळायची असल्याने सध्या मुलेच आहे, असे कनकाने सांगितले.

काश्मिरातील ‘प्रगाश’चा आदर्श
7 मे 2013 रोजी या बँडचा पहिला कार्यक्रम झाला. मनात धाकधूक होती ती प्रतिसादाची. त्यात डोळय़ासमोर उदाहरण होते ते काश्मिरातील प्रगाश या मुलींच्या पहिल्या वहिल्या म्युझिक बँडचे. तीन हायस्कूलच्या मुलींनी एकत्र येऊन स्थापन केलेला हा बँड एकाच कार्यक्रमानंतर कडव्या विरोधामुळे बंद करावा लागला. त्यामुळे मनात भीती होती, पण येथे खूपच वेगळा अनुभव आला. लोकांना आमचा बँड खूपच आवडला. आमच्या बँडमध्ये उगाचच कल्ला आणि चित्रविचित्रपणा नाही की वाद्यांचा गोंगाट नाही. यात शास्त्रीय जुगलबंदीही आहे. क्लासिकल रॉक हा नवा फ्लेवर आहे. याशिवाय देशभक्ती आणि हलकी फुलकी गाणी आम्ही घेतो. आता मराठी गाण्यांचाही समावेश करणार आहोत, असे कनकाने स्पष्ट केले. अद्याप अल्बमचे काही ठरवलेले नाही, पण आम्ही लिहिलेली आणि संगीत दिलेली गाणी गाण्याचा विचार आहे.