नागपूर - ‘ज्या मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी चार वर्षे आम्हाला दिसलीच नव्हती, ती आता अचानक जाहिरातींमधून दररोज दिसू लागली आहे. चार वर्षे पडून राहिलेल्या फायली गत सहा महिन्यांत हातावेगळ्या करताना मग त्यापूर्वी त्या क्लिअर का केल्या नाहीत?’, असा सवाल करतानाच पृथ्वीराज चव्हाण हे मि. क्लीन निश्चितच नाहीत, अशी तोफ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी नागपुरात डागली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील चार वर्षांतील कंपन्या आणि बिल्डरांच्या फायली गत सहा महिन्यांत पटापट क्लीअर केल्या. एक अध्यादेश तर केवळ दोन दिवसांसाठी आणून त्वरीत तो मागेही घेण्यात आला.
सरकारने चौकशी करावी : चव्हाणांच्या स्वच्छ प्रतिमेवर तोंडसुख घेत त्यांच्या निर्णयांची माहिती
आपण मागवली असून आगामी सरकारने चौकशी केली पाहिजे, असेही ते म्हणाले जाहिरातींचा पैसा कोठून? : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या व चव्हाणांच्या जाहिरातींचे प्रमाण पाहिल्यावर त्यासाठी त्यांनी फंड कोठून आणला, असा प्रश्न पडतो आहे. जाहिरातींमध्ये ते स्वाक्षरी करताना दिसतात. चार वर्षांत निर्णय घेण्यासाठी त्यांची स्वाक्षरी दिसली नाही, अशी टीकाही पवार यांनी केली.
सारवासारव
जलसंपदामंत्री असताना तुमच्या काळातही अवघ्या काही दिवसांत हजारो कोटींच्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली? या प्रश्नावर मात्र अजित पवार बॅकफूटवर आले. ‘माझ्याकडे तेवढ्या फाइल आल्या, त्यामुळे त्या मी क्लिअर केल्या,’ अशी सारवासारव त्यांनी केली.