आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटची तार स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीसाठी,सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भवाद्यांची शक्कल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - सुमारे 160 वर्षांपासून सुरू असलेली तार सेवा रविवारी काळाच्या पडद्याआड गेली. मात्र अखेरच्या दिवशी रविवारी या ‘संवादसेतू’चा उपयोग करत विदर्भवाद्यांनी वेगळ्या राज्याची मागणी करणारी शेवटची तार राष्‍ट्रपती, पंतप्रधान व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पाठवली.


स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीकडे सरकारचे व जनतेचे लक्ष वेधण्याची एकही संधी न सोडणा-या विदर्भवाद्यांनी ही शक्कल लढवली. ‘विदर्भ राज्याची मागणी पूर्ण करा’ या आशयाचा मजकूर असलेली ही तार नागपुरातून नाग विदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून पाठवण्यात आली.


समितीचे केंद्रीय महासचिव अहमद कादर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, आंध्र प्रदेशातील तेलंगणा हे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या पातळीवर अंतिम टप्प्यात आलेली आहे. मात्र विदर्भाची मागणी त्यापेक्षा जुनी आहे. या मागणीला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे. त्यामुळे या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे. तारसेवेच्या दृष्टीने रविवारी ऐतिहासिक दिवस होता. त्यामुळेच आमच्या मागणीलाही ऐतिहासिक महत्त्व मिळवून देण्यासाठी देशातील प्रमुख नेत्यांना तार पाठविण्यात आल्याचे कादर म्हणाले.


एक हजार कार्यकर्ते दिल्लीला पाठवणार
तेलंगणा राज्य निर्मिती निर्णायक टप्प्यावर असताना वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडेही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समितीच्या वतीने इतर समविचारी संघटनांच्या सहकार्याने सुमारे एक हजार कार्यकर्ते दिल्लीला पाठवण्याचा कार्यक्रम तयार होत असल्याचे कादर यांनी सांगितले.