आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संता-बंता’च्या विनोदातून भावना दुखावू नका, ‘शीख संगत’चे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर -‘गेल्या काही वर्षांपासून विनोदनिर्मितीसाठी सरदारजी अथवा संता-बंता अशा पात्रांचा वापर होत आहे. त्यामुळे विशिष्ट समुदाय टिंगलटवाळीचा विषय ठरला आहे. त्यातून भावनाही दुखावल्या जातात. त्यामुळे यापुढे असे प्रकार टाळले जावेत,’ असे आवाहन नागपूर शीख संगत या संस्थेने केले आहे. याबाबत त्यांनी पोलिसांनाही निवेदन दिले आहे.
सोशल मीडियाचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. त्यात विनोदी किस्से मोठय़ा प्रमाणात शेअर केले जातात. बहुतांश विनोदांमध्ये सरदारजी आणि संता-बंता या पात्रांचा समावेश हमखास आढळतो. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अशा विनोदांमुळे एका विशिष्ट समुदायाच्या भावना अप्रत्यक्षपणे दुखावल्या जातात, याकडे नागपूर शीख संगतने लक्ष वेधले आहे. अलीकडेच ‘शीख संगत’च्या शिष्टमंडळाने नागपूरच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून या मुद्दय़ाकडे पोलिस यंत्रणेचे लक्ष वेधले. पोलिसांनीही त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. यासंदर्भात नेमकी तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाईचा निश्चितपणे विचार होईल, असे आश्वासन पोलिसांनी या शिष्टमंडळाला दिले आहे.

जागृतीनेच बसू शकेल आळा : ‘शीख संगत’चे प्रमुख बलबीरसिंग रेणू यांच्या मते, कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणतेपणाने लोक असे विनोद शेअर करीत आले आहेत. मात्र त्यामुळे एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जातात, याचा आजवर कुणीही विचार केला नाही. त्यामुळे किमान यापुढे तरी विनोद करताना कुठल्याही समुदायाच्या प्रतीकांचा वापर होऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. ‘नागपूर शीख संगत’ने या विषयावर जनजागृती घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कुठल्याही पोलिस कारवाईने नव्हे तर जागृतीने या प्रकारांना आळा बसू शकेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

एकही तक्रार आलेली नाही
यासंदर्भात नागपूर पोलिसांकडे अद्याप एकही तक्रार आलेली नाही. मात्र समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार आल्यास कुठल्या कलमान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो, हा चर्चेचा मुद्दा ठरू शकेल. के. के. पाठक, पोलिस आयुक्त, नागपूर
कलम कोणते लावणार?
नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ अँड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनीही नागपूर शीख संगतच्या भूमिकेवर सहमती दर्शवली आहे. ‘विनोद करताना कुठलाही विशिष्ट समुदाय थट्टामस्करीचा विषय ठरायला नको. भारतीय दंड विधानाच्या कलम 295 (अ) आणि 298 कलमान्वये विशिष्ट समुदायाच्या भावना (धार्मिकही) दुखावणार्‍या व्यक्तीला शिक्षा तसेच दंडाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे. मात्र, अशा धाटणीचा एखादा विनोद शेअर झाल्यास नेमक्या कुठल्या कलमान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो, हा न्यायालयीन चर्चेचा विषय ठरू शकेल,’ असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.