आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एमबीए’ची क्रेझ ओसरली; देशातील 176, तर राज्यातील 11 महाविद्यालयांना कुलूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भारतीय शिक्षण व्यवस्था झपाट्याने बदलत असून गेल्या काही वर्षांत देशात व्यावसायिक अभ्यासक्रमांचे फॅड आले आहे, परंतु या अभ्यासक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या एमबीए अभ्यासक्रमाची क्रेझ मात्र ओसरत असल्याचे दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणजे गेल्या दोन वर्षांत देशभरातील 176, तर राज्यातील 11 एमबीए महाविद्यालयांना टाळे ठोकण्यात आल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून समोर आली.
सर्वेक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध मुंबई स्थित ‘क्रिसिल रिसर्च’ या संस्थेने एमबीए, सीए, मानव्यशास्त्र आदी शाखांच्या अभ्यासक्रमांबाबत देशपातळीवर सर्वेक्षण केले. त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. पाच वर्षांपूर्वी देशात एमबीए अभ्यासक्रमाचे बूम आले. त्यामुळे 2009-10 मध्ये देशात असलेल्या 3 हजार व्यवस्थापन महाविद्यालयांची संख्या 2012-13 मध्ये तब्बल साडेचार हजारांवर पोहोचली होती.

क्रिसिल रिसर्चने सर्वेक्षणासाठी शिक्षणाचा दर्जा, सुविधा, तज्ज्ञ मार्गदर्शक व प्लेसमेंटच्या आधारावर महाविद्यालयांची टायर-1, टायर-2, टायर-3 आणि टायर-4 अशी विभागणी केली होती. गेल्या तीन वर्षांत उघडलेल्या बी-स्कूलमध्ये सर्वाधिक प्रमाण हे टायर-3 आणि टायर-4 वर्गातील महाविद्यालयांचे आहे. मागणी वाढल्याने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनेही (एआयसीटीई) मोठय़ा प्रमाणात व्यवस्थापन महाविद्यालयांना परवानगी दिली.
सध्याचा विद्यार्थी शिक्षणाप्रती जागरूक असून शिक्षणाचा दर्जा, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांबद्दल आग्रही झाला आहे. त्यामुळेच वरील सोयी नसणार्‍या महाविद्यालयांना एमबीएचे विद्यार्थी मिळणे कठीण झाले आणि 2012-13 आणि 2013-14 या दोन वर्षांत 176 महाविद्यालयांना आपले दुकान बंद करावे लागले. त्यात महाराष्ट्रातील 11 महाविद्यालयांचा समावेश आहे. भविष्यात हा आकडा वाढू शकतो, असे अहवालात नमूद आहे.
कॅट देणार्‍यांचेही प्रमाण घटले : 2009-10 मध्ये देशात एमबीएचे बूम आले. त्यानंतर 2010, 2011 मध्ये ‘एमबीए’ला प्रचंड मागणी होती. 2011-12 मध्ये तर प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘कॉमन अँडमिशन टेस्ट’साठी (कॅट) 2 लाख 14 हजार विद्यार्थी बसले होते. त्यानंतर 2012-13 पासून एमबीएची क्रेझ मात्र ओसरायला लागली. 2012-13 मध्ये केवळ 1 लाख 95 हजार, 2013-14 मध्ये 1 लाख 87 हजार आणि 2014-15 मध्ये 1 लाख 93 हजार विद्यार्थ्यांनी ‘कॅट’ परीक्षा दिली.

1 लाख 30 हजार जागा रिक्त
त्यापैकी गेल्या वर्षी केवळ 69 टक्केच जागा भरल्या गेल्या. तब्बल 1 लाख 30 हजार जागा रिक्त होत्या. याचा फटका टायर-3 आणि टायर-4 वर्गातील महाविद्यालयांना बसला.
2013-14 मध्ये ही संख्या 4 लाख 30 हजारांवर पोहोचली.
2009-10 मध्ये देशात एमबीए अभ्यासक्रमाच्या 2 लाख 40 हजार जागा होत्या.

कमी वेतनामुळे पाठ
सध्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब मार्केटवर अवकळा पसरली आहे. शिवाय एमबीए शिक्षणासाठी येणार्‍या खर्चाच्या तुलनेत एमबीए विद्यार्थ्यांना नोकरीसाठी कमी वेतनावर ऑफर दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘एमबीए’कडे पाठ फिरवली आहे.
जय श्रीनिवासन, संचालक, क्रिसिल रिसर्च कंपनी मुंबई