आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेत्यांचे रस्ते झक्कास, सामान्यांचे भकास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून आमदार रवी राणा व उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे यांच्यात जुंपली होती. अशा प्रसंगांतून नेतेमंडळी कितीही कळवळा दाखवत असली तरी त्यांच्या घरापुढील रस्ते चकाचक अन् सर्वसामान्यांच्या घरासमोर खड्डे असे कायम वास्तव आहे.


रस्ते दुरुस्ती, मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा, मनपा फंड तसेच राज्य शासनाचा विशेष निधी अशा शीर्षांच्या माध्यमाने रस्ते दुरुस्त करता येऊ शकतात, परंतु, सर्वसामान्यांसाठी नियोजनच होत नसल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य रस्ते चांगले असले तरी अंतर्गत रस्त्यांची फारच बिकट स्थिती आहे. निधीची कमतरता असल्याचे मनपाकडून वारंवार सांगितले जाते. तथापि, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून कररूपाने गोळा करण्यात येणार्‍या पैशांतूनच नेत्यांच्या घरासमोरील रस्ते चकाकत आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी विविध माध्यमातून खर्च केला जात असला तरी प्रत्यक्षात रस्त्यांसाठी किती रक्कम खर्च होते, याचा नेमका आकडा सांगणे कठीण असल्याचे अधिकारी सांगतात. सर्वसामान्यांच्या समस्यांबात मनपा प्रशासन किती जागरुक आहे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. नेत्यांच्या घरासमोरील रस्ते दुरुस्त करण्यासाठी मनपाकडे निधी असेल, तर सर्वसामान्यांच्या घरापुढील रस्त्यांवर खड्डे कायम का असतात, असा सवाल नागरिकांनी केला आहे.


निधी उपलब्ध होताच कामे
सध्या पावसामुळे कामे मंजूर होऊनदेखील झालेली नाहीत. मात्र, ही कामे तातडीने होतील. काही ठिकाणी निधीची अडचण आहे. निधी येताच त्या कामांना सुरुवात होईल. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. वंदना कंगाले, महापौर.


महापौर आहेत तरी कोठे?
महापौरांनी निवड झाल्यानंतर कधीही चक्कर मारलेली नाही. कार्यक्रमांना मात्र त्या आवर्जून उपस्थित असतात. महापौरांनी फक्त आपल्या परिसरातीलच रस्त्यांकडे लक्ष दिले. वॉर्डातील नागरिक झटके खात आहेत. मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. मात्र महापौर व नगरसेवक संजय अग्रवाल हे कधी वॉर्डात दिसलेच नाहीत. गोपालकृष्ण राठी, टोपेनगर.


समन्वयाचा अभाव
मनपा तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने रस्त्यांची ही अवस्था झाली आहे. भुयारी गटार योजना हे याचे मुख्य कारण आहे. नंदकिशोर वर्‍हाडे, उपमहापौर.