आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Legislative Session: Four Nationalist Congress MLAs Give Resignation

विधिमंडळ अधिवेशन: राष्ट्रवादीच्या 4 आमदारांचे अवैध बांधकामासाठी राजीनामे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, या मागणीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादीतीलच चार आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आपले राजीनामे सोपवले आहेत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही आमदारांनी राजीनामे दिल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना मान्य केले. दिलीप वळसे पाटील यांनीही त्यांच्या कार्यालयाकडे राजीनामे आल्याचे सांगितले.
वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे गेल्या चार वर्षांपासून अनधिकृत बांधकामे नियमित करावीत म्हणून पाठपुरावा करत आहेत. पिंपरी चिंचवडमधील अपक्ष, परंतु राष्ट्रवादीसोबत असलेले आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे अपक्ष परंतु राष्ट्रवादीसोबत असलेले आमदार विलास लांडे आणि पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. ही बांधकामे उल्हासनगर महापालिकेच्या धर्तीवर दंड आकारून नियमित करावीत, अशी मागणी केली जात आहे. भाजप आणि शिवसेनेने याबाबत मंगळवारी एका मोर्चाचे आयोजन केले असून, अधिवेशनात एक लक्ष्यवेधी सूचनाही मांडली आहे. जर ही बांधकामे नियमित केली तर त्याचे श्रेय भाजप-शिवसेनेला जाईल म्हणून राष्ट्रवादीने खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.
आमदारांच्या राजीनाम्यांची पुष्टी करताना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, आमदारांनी राजीनामे दिले असून, अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यास आमचाही पाठिंबा आहे.
नगरसेवकांचे राजीनामे
राष्ट्रवादीच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर पिंपरी-चिंडवडच्या 40 नगरसेवकांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणीला बळ मिळण्याची शक्यता आहे.