आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loco Pilot And Fish Plats Inspector Service Spot Big Accident Near Wardha

EXCLUSIVE: ...अन् सतर्कतेमुळे टळला नागपूर-वर्धा रेल्वे मार्गावरील अपघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर-वर्धा दरम्‍यान ठप्‍प झालेली रेल्‍वे वाहतूक तब्‍बल 60 तासांनंतर सुरु करण्‍यात आली. रेल्‍वे रुळांखालची मातीच वाहून गेली होती. अशा वेळी एखादी गाडी त्‍यावरुन गेली असती तर हजारो प्रवाशाचे प्राण धोक्‍यात आले असते. परंतु, रेल्‍वेचे लोको पायलट आणि प्रशासनाने दाखविलेल्‍या सतर्कतेमुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.

गेल्या शुक्रवारी नागपूर- वर्धा रेल्वे मार्गावरील सिंदी ते तुळजापूर रेल्‍वे स्‍थानकांदरम्‍यान 300 मीटरपर्यंतच्या रुळाखालची माती वाहून गेली होती. शुक्रवारी रात्री 8.25 वाजताच्‍या सुमारास या सेक्‍शनवरुन त्रिवेंद्रम-कोरबा एक्‍स्प्रेस पास झाली. या गाडीचे प्रवासी सुदैवी ठरले. त्‍यावेळेस माती खचण्‍यास सुरुवात झाली होती. ही बाब लोको पायलट सी. सी. हरडे यांच्‍या लक्षात आली. त्‍यांच्‍यासोबत फिशप्‍लेट इन्‍स्‍पेक्‍टर आर. पी. कमल हेदेखील होते. रात्रीच्‍या प्रवासादरम्‍यान रेल्‍वे ट्रॅक तपासणीचे काम चोखपणे बजावण्‍यात येते. त्‍यामुळे लोकोमध्‍ये एक फिशप्‍लेट निरीक्षक कोणत्‍यातरी गाडीमध्‍ये असतोच. सुदैवाने याच गाडीमध्‍ये एक निरीक्षक होता. गाडी पास होताना त्‍यांना अचानक मोठा धक्‍का बसला. हा काही नेहमीसारखा धक्‍का नसल्‍यामुळे त्‍यांनी तत्‍काळ सिंदी रेल्‍वे स्‍थानकावरुन नियंत्रण कक्षाला सूचना दिली. तिथून गँगमनचे एक पथक त्‍यांनी सांगितलेल्‍या सेक्‍शनजवळ गेले. हे पथक तिथे पोहोचले त्‍यावेळेस रुळांखालची माती पूर्णपणे वाहून गेली होती. रेल्‍वेरुळ अधांतरी लटकत असल्‍याचे त्‍यांना दिसले. क्षणाचाही विलंब न करता त्‍यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. ही माहिती नागपूरला कळविण्‍यात आली. त्‍याच क्षणी एक गाडी तुळजापूर स्‍थानकावर थांबविण्‍यात आली. नागपूर येथून रात्री 8.50 आणि 9 वाजता सुटणा-या नागपूर-मुंबई दुरांतो आणि सेवाग्राम एक्‍स्‍प्रेस सोडण्‍यात आल्‍याच नाही. हे सर्व 5 ते 10 मिनिटांच्‍या आत घडले.

लोकोपायलट सी.सी. हरडे आणि फिशप्‍लेट निरीक्षक आर. पी. कमल यांनी चोखपणे कर्तव्‍य बजावले. हा प्रकार त्‍यांच्‍या लक्षात आला नसता तर मोठा अपघात झाला असता. त्‍यांच्‍या मागून त्रिवेंद्रम-नवी दिल्‍ली केरळ एक्‍स्‍प्रेस धडाडत धावत होती. अधांतरी तरंगत असलेल्‍या रुळांवरुन ही गाडी गेली असती तर भीषण अपघात झाला असता. दुसरी गाडीही त्‍यावर धडकण्याची भीती होती.

अशा प्रकारचे अपघात यापूर्वीही घडले आहेत. जून 2011 मध्‍ये मुंबई-नागपूर विदर्भ एक्‍स्प्रेस एका लोकलच्‍या घसरलेल्‍या डब्‍यावर धडकली होती. त्‍यात 4 जणांचा मृत्‍यू झाला होता. तर 2010 मध्‍ये नक्षलवाद्यांनी खडकपूर जवळ एक मालगाडी उडवून दिली होती. या मालगाडीच्‍या डब्‍यांवर हावडा-मुंबई ज्ञानेश्‍वरी एक्‍स्‍प्रेस धडकली होती. त्‍यातही अनेकांचा मृत्‍यू झाला होता. त्‍यानंतर हावडा ते खडकपूर सेक्‍शनदरम्‍यान रात्रीची वाहतूक तब्‍बल 2 वर्षे बंद ठेवण्‍यात आली होती.

पावसामुळे रेल्‍वे रुळांखालची माती वाहून जाण्‍याचा प्रकार 26 जुलै 2005 ला कल्‍याण ते कसारा दरम्‍यान घडला होता. त्‍यावेळी अतिवृष्‍टी झाली होती. 26 जुलैच्‍या पावसामुळे संपूर्ण मुंबई तुंबली होती. कल्‍याण शहरातही 5 ते 6 फुट पाणी अनेक ठिकाणी साचले होते. त्‍यावेळेसही 4 दिवस हा मार्ग पूर्णपणे बंद होता. पावसामुळे दुरुस्‍तीच्‍या कामात प्रचंड अडथळे आले होते. तरीही युद्धपातळीवर काम करुन रेल्‍वेने 4 दिवसांमध्‍ये वाहतूक सुरु केली होती. रेल्‍वेच्‍या सुरक्षिततेबाबत अनेक वेळा प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित करण्‍यात येतात. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. परंतु, रेल्‍वे कर्मचा-यांच्‍याच सतर्कतेमुळे अनेक अपघात टळले आहेत. यासाठी हॅट्स ऑफ टू रेल्‍वे.