आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सर्वच जेलचे ६ महिन्यांत सुरक्षा ऑडिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपूर मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगत पाच कुख्यात आरोपी फरार झाल्याची गृह विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. राज्यातील इतर काही कारागृहांतूनही कैदी पसार होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या विभागात शिरलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी राज्यातील सर्वच कारागृहांच्या सुरक्षेचे ऑडिट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखांवर सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘एसीबी’चे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनीही त्याला दुजोरा दिला.

नागपूर कारागृहाची अभेद्य सुरक्षा भेदून पाच कैदी पसार झाल्याला आठवडा उलटला तरी अद्याप एकाही आरोपीला शोधण्यात यश आलेले नाही. अतिरक्ति पोलिस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर व ‘एसीबी’चे महासंचालक प्रवीण दीक्षित या प्रकाराची चौकशी करत आहेत. यातून कारागृहातील प्रशासकीय यंत्रणेला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीचे नवनवे किस्से रोज उघड होत आहेत. या भ्रष्ट यंत्रणेमुळेच कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्याची गंभीर दखल घेऊन गृह विभागाने आता राज्यातील सरसकट सर्वच केंद्रीय तसेच जिल्हा कारागृहांचे सुरक्षा ऑडिट हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘एसीबी’ करणार शिफारशी
प्रत्येक कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेत सध्या काय त्रुटी आहेत, त्यात कुठल्या सुधारणा तत्काळ करण्याची गरज आहे, कारागृहातील भ्रष्टाचारावर कशा पद्धतीने अंकुश लावता येईल याचा अभ्यास करून त्यावर सहा महिन्यांत शिफारशी करण्याच्या सूचना गृह विभागाने ‘एसीबी’ला दिल्या आहेत. नागपूर कारागृहातील घटनेच्या तपासाच्या निमित्ताने दीक्षित सध्या नागपुरात आहेत. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला असता त्यांनीही या निर्णयाला दुजोरा दिला.