आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुखांवर गुन्हा, रेशन दुकानदारांवर मतदानासाठी दबावाचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री, राष्ट्रवादीचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल देशमुख यांनी मतदानाच्या एक दिवस आधी अमरावतीत रेशन दुकानदारांची गुप्त बैठक घेऊन त्यांना राष्ट्रवादीला मतदान करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप शिवसेनेचे विद्यमान खासदार व अमरावतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी केल्यानंतर देशमुखांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल करण्यात आला.
अनिल देशमुख यांनी मतदानाच्या एक दिवस आधी बुधवारी अमरावतीमधील एका हॉटेलमध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना बोलावून गुप्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत काही सूचना देण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने आनंदराव अडसूळ, रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई हे कार्यकर्त्यांसह हॉटेलमध्ये पोहोचले. या वेळी अनिल देशमुख आणि त्यांचे काही कार्यकर्ते खोली क्रमांक 318 समोर उभे होते. तेथे अडसूळ यांनी देशमुख यांना बैठकीबाबत विचारणा केली. सत्तेचा दुरुपयोग करून रेशन दुकानदारांची बैठक बोलावता, असा आरोप अडसूळ यांनी केला. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बैठक झाली नाही, असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले.
दरम्यान, हॉटेलमध्ये रेशन दुकानदारांची बैठक घेऊन केलेल्या आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे आनंदराव अडसूळ यांनी केली. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले निवडणूक निरीक्षक ए. के. शर्मा यांनी अडसूळ यांचे म्हणणे ऐकून तातडीने हॉटेल गाठले. त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात अनिल देशमुख यांच्या खोलीबाहेर मोठ्या संख्येने लोक उभे असल्याचे दिसत आहे, हे शर्मा यांनी मान्य केले.
दरम्यान, रिपाइंचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांनी मंत्री अनिल देशमुख यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. देशमुख यांनी स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचा प्रचार
जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सत्तेचा दुरुपयोग करून करण्यात येत आहे. याबाबत आयोगाने चौकशी करून तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे.’’
आनंदराव अडसूळ, शिवसेना, खासदार
कार्यकर्त्यांना भेटलो
हॉटेलमध्ये आलेले नागरिक हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. निवडणुकीच्या काळात येणार्‍या कार्यकर्त्यांना भेटलो, यात गैर काय? रेशन दुकानदारांची बैठक बोलावली नव्हती.’’
अनिल देशमुख, मंत्री