आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिबाई हायस्कूलच्या कीर्तीने रोखले पूजाला; श्रेया लाहोटीने पटकावले तिसरे स्थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आक्रमक खेळाच्या आधारे मणिबाई गुजराती हायस्कूलच्या कीर्ती डोंगरकरने जिल्हा शालेय लॉन टेनिस स्पर्धेत स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या पूजा रघुवंशीचा एकतर्फी अंतिम सामन्यात 2-0 ने पाडाव करून मुलींच्या मनपा 17 वर्षांखालील गटाचे अजिंक्यपद पटकावले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे क्रीडा संकुलातील सिंथेटिक कोर्टवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात कीर्ती डोंगरकरने अव्वल स्थान पटकावले, तर पूजा रघुवंशीला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. पूजाने चुरशीच्या उपांत्य सामन्यात स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या श्रेया लाहोटीचा 2-1 ने पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यामुळे श्रेयाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत होलिक्रॉस हायस्कूलच्या शाश्वती तिडकेने स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या रसिका हरवानीला 2-0 ने नमवले. मुलींच्या 19 वर्षांखालील मनपा गटात ब्रजलाल बियाणी महाविद्यालयाच्या निधी दवेने अव्वल स्थानावर ताबा मिळवला. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी संजय कथळकर यांच्या मार्गदर्शनात पंच प्रफुल्ल मेहता, मोहंमद मुस्तफा काझीम यांनी स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेत मुले व मुलींच्या गटात अव्वल पाच क्रमांक मिळवणारे खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

गोविंद अग्रवाल अव्वलस्थानी :
17 वर्षांखालील मुलांच्या मनपा गटात तखतमल इंग्रजी हायस्कूलच्या गोविंद अग्रवालने नेटजवळ चपळ खेळ करीत गोल्डन किड्सच्या हितेश दासमलानीला 2-1 ने नमवून विजेतेपद पटकावले. हितेशला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गोल्डन किड्सच्या नितीन पुरसवानीने मणिबाई गुजराती हायस्कूलच्या स्वप्निल जयसिंगपुरेला 2-0 ने नमवून तिसरे स्थान पटकावले. राजेश्वरी विद्या मंदिरच्या जय पटेलला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

17 वर्षांखालील अमरावती जिल्हा विभागात तोष्वी काळेने बाजी मारली, तर मुलांच्या गटात इंडो पब्लिक स्कूलच्या विराज ठाकरेने अव्वल स्थान पटकावले. 14 वर्षांखालील मुलींच्या अमरावती जिल्हा गटात श्रावणी धवले विजेती ठरली.
मानव गुल्हानेला जेतेपद
मुलांच्या 17 वर्षांखालील अमरावती जिल्हा गट लॉन टेनिस स्पर्धेत मानव गुल्हानेने बाजी मारली. अंतिम सामन्यात त्याने गौरव नानवानीला 2-1 ने नमवले. सिद्धांत अग्रवालने क्षितीज राठीला 2-0 ने पराभूत करून दुसरे स्थान मिळवले. क्षितीजला गुणांच्या आधारे तिसरे व गौरव नानवानीला चौथे स्थान देण्यात आले.
खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी पात्र
लॉन टेनिस स्पर्धेत मुले व मुलींच्या गटात अव्वल पाच क्रमांक मिळवणारे खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी संजय कथळकर यांच्या मार्गदर्शनात पंच प्रफुल्ल मेहता, मोहंमद मुस्तफा काझीम यांनी स्पर्धा यशस्वी केली.