आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात जनतेची लूट सुरू - मनोहर पर्रीकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - गोव्यात सरकारने व्हॅट रद्द केल्यामुळे पेट्रोल साठ रुपये प्रतिलिटर दराने मिळते. महाराष्ट्रात मात्र जनतेची लूट होते, अशी टीका गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली. महाराष्ट्रात व्यापार्‍यांची छळवणूक होते, तसेच पुण्यात अजितदादांचे समाधान केल्याशिवाय काहीच होत नाही, असे लोक सांगत असल्याचेही पर्रीकर म्हणाले.

फ्रेंड्स ऑफ बीजेपी संस्थेच्या वतीने साई सभागृहात ‘विकसित भारतासाठी भाजपचे व्हिजन’ या विषयावरील व्याख्यानात पर्रीकर बोलत होते. देशाचे नेतृत्व करण्यासाठी साधेपणाचा गुण कामाचा नाही. त्यासाठी उत्तम प्रशासकाचे गुणच महत्त्वाचे ठरतात. कुठल्याही नेत्याची पारख एका दिवसात करू नका, असा सल्ला पर्रीकर यांनी दिला. सध्याच्या स्थितीत मोदींशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. केजरीवाल यांच्या साधेपणावर चर्चा होत असली, तरी दिल्लीत त्यांनी केलेले 49 दिवसांचे मनोरंजन सगळ्यांनीच पाहिले आहे, असेही ते म्हणाले.

पक्षात नाराजी नाही
भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावरील नेत्यांमध्ये कुठलेही नाराजीचे वातावरण नाही. जसवंतसिंह यांचे प्रकरणही मीडियानेच अधिक फुगवल्याचा आरोप मनोहर पर्रीकर यांनी केला. पक्षात लोकशाहीचे वातावरण असल्याने वेगळे विचारही येतात, असे सांगताना पर्रीकर म्हणाले की, पक्ष जिंकण्याच्या मार्गावर असेल तर स्पर्धा लागतेच. एकाच जागेवर लढण्यासाठी अनेक उमेदवार तयार होतात. ही स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे ते म्हणाले. केवळ राजकारणीच भ्रष्ट नसून संपूर्ण व्यवस्थाच खराब असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे राष्ट्रीय संयोजक आर. पी. सिंग, भाजप नेत्या शायना एन.सी. उपस्थित होते.

शिस्त आणि जसवंतसिंह
भाजपमध्ये इतर पक्षांतून नेते येत असल्याचा परिणाम पक्षातील शिस्तीवर होणार नाही काय, या प्रश्नावर बोलताना जसवंतसिंह हेदेखील अनेक वर्षांपासून पक्षात आहेत, याकडे पर्रीकर यांनी लक्ष वेधून आपली नाराजी अप्रत्यक्षपणे मांडलीच. भाजपच्या हर हर मोदी या घोषणेवर टीका होत असली, तरी प्रत्यक्षात या घोषणेचा धार्मिक बाबीशी संबध नाही. हर हर मोदी घोषणेचा अर्थ प्रत्येक कार्यकर्ता हा मोदी आहे, या अर्थानेच घ्यायला हवा, असेही पर्रीकर म्हणाले.

काँग्रेसला 100 च्या आत गुंडाळा
देशाला स्थिर सरकार हवे असेल, तर रालोआला किमान 272 जागा मिळणे महत्त्वाचे आहे. तथापि, काँग्रेसला शंभरच्या आत ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण काँग्रेस हा विचित्र पक्ष असून त्यांच्याकडून अस्थिरतेचे प्रयत्न होतील, असे पर्रीकर म्हणाले.