आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Language And Literature Is Great Says Prabha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाषेसाठी कळकळ असेल तर पदरमोड करायला हवीच - साहित्यिक प्रभा गणोरकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - साहित्य संमेलनात पारित करण्यात येणारे ठराव केवळ एक उपचार असतात. आजपर्यंत शासनाकडे एकही ठराव कधी पाठवला गेला आणि त्यावर कधी काही झाले असे मला तरी वाटत नाही. ठरावांचा नीट पाठपुरावा व्हावा. जनसामान्यांच्या भावनांचे प्रतिनिधित्व म्हणून असे ठराव केले जातात, अशी प्रतिक्रिया साहित्यिक प्रभा गणोरकर यांनी व्यक्त केली.

सासवड येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनातील चारही उमेदवारांनी प्रचाराला सुरू केला आहे. प्रभा गणोरकर यांच्या उमेदवारीने रंगत आणखी वाढली आहे. निवडून आल्यास त्या पाचव्या महिला अध्यक्षा ठरतील. या अनुषंगाने गणोरकरांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, एसएमएस आणि ई-मेलच्या जमान्यातही मी मतदारांना पत्र लिहिते आहे, याचे अनेकांना आश्चर्य वाटते. आता प्रचारासाठी आणि मतदारांशी संपर्क साधण्यासाठी वेळ खूप थोडा आहे. केवळ दीड दोन महिने हाती आहे. मतदारांची संख्याही वाढली आहे. एसएमएससाठी मोबाईल क्रमांक हवेत. मराठवाड्यातील एकाचाही क्रमांक नाही. ई-मेलसाठी सर्वांचे ई-मेल अँड्रेस हवेत. सर्वांचे पोस्टाचे पत्ते असल्याने पत्राने संपर्क हाच उपाय आहे.

माझे काम शांतपणे सुरू आहे. 50 वर्षांपासून मी वाड्मयाच्या क्षेत्रात आहे. नामदेव ढसाळांच्या पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे. वाचन, लेखन सातत्याने सुरू आहे. याशिवाय सभा, संमेलनांमधून विचार मांडणे सुरूच असते, असे त्या म्हणाल्या. आता मराठी साहित्य जनसन्मुख राहिलेले नाही. लोक साहित्य वाचत नाहीत. मराठी भाषकांचा मोठा वर्ग मराठी साहित्यापासून दुरावला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने उत्सवमूर्ती न राहता लोकांमधील एक झाले पाहिजे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला फिरण्यासाठी एक गाडी, कार्यालय व पत्रव्यवहारासाठी सहायक देण्यात यावा, अशी मागणी माजी संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांनी केली होती, याकडे गणोरकर यांचे लक्ष वेधले. तसेच संमेलनाध्यक्षाला त्याच्या कार्यकाळासाठी एक लाख रुपये दिले जातात. त्यात वाढ करायला हवी, असे वाटते का, यावर त्या म्हणाल्या, सरकार, महामंडळ किंवा अन्य कोणाकडे पैसे का मागायचे. आपण कोणावरही अवलंबून राहू नये व पैशांची मागणी करू नये, असे माझे स्पष्ट मत आहे. मी आजपर्यंत कधीही पद, पैसा वा गाडीची अपेक्षा केली नाही. अध्यक्षपदी निवडून आल्यावरही माझी ही भूमिका कायम राहील. भाषेविषयी कळकळ असेल, तर पदरमोड करावी.