आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti B. Chitampalli Is A Wildlife Conservationist And Marathi Writer From Maharashtra

मला माझाच वारसदार दिसत नाही : चितमपल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - प्राणीकोश वर्षभरात वन्यजीव प्रेमींच्या हातात येईल. याशिवाय वृक्षकोश आणि मत्स्यकोशाचे काम सुरू आहे. ही सर्व कामे एकट्यानेच करतो आहे. कारण मला माझाच वारसदार दिसत नाही, अशी खंत अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. बुधवार 12 नोव्हेंबर ही चितमपल्ली यांचे गुरू पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती पक्षीदिन म्हणून साजरी करण्यात येते. योगायोगाने 12 नोव्हेंबर हा मारुती चितमपल्ली यांचादेखील वाढदिवस आहे. ते निमित्त साधून त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

चितमपल्ली म्हणाले, प्राणीकोशात सस्तन वर्गातील 425 प्रकारच्या प्राण्यांची सचित्र माहिती आहे. मत्स्यकोश आणि वृक्षकोशावर काम सुरूच आहे. माझ्याकडे कुणीच येत नाही. या क्षेत्रात येऊन कष्ट घेण्याची कुणाची तयारी नाही. नव्या पिढीत अजिबात धीर नाही. वाट पाहायची कुणाची तयारी नाही. सर, शॉर्टकट सांगा ना, अशी तरुणांची मागणी असते. मोबाइलमधील कॅमेºयाने ते पक्षीनिरीक्षण करायला निघतात, आता बोला! कर्नाटक, तामिळनाडू, केरळ येथे वन्यजीवशास्त्राचा अभ्यासक्रम आहे. अनेकांना सांगितले, बी. एस्सी. बायोलॉजी करून वनाधिकारी व्हा. नंतर वन्यजीवशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करून संशोधन करा.

वनाधिकारी असल्याने जंगलात राहता येते. त्याचा फायदाही होईल. काही विद्यार्थ्यांनी तसे केलेही. पण संशोधन मात्र काही केले नाही. मी सलीम अली यांच्या सहवासात तब्बल 20 वर्षे घालवली. त्यांच्याकडून सातत्याने शिकत गेलो. इतकी वर्षे थांबण्याची कुणाची तयारी नाही. मत्स्यकोशात समुद्रातील 430 प्रकारच्या आणि गोड्या पाण्यातील 100 प्रकारच्या माशांची माहिती आहे. या माशांची मराठीतील नावे माहिती करून घेण्यासाठी मी वर्षभर कोकणात राहिलो. चार चार दिवस समुद्रात घालवले. आज एवढी मेहनत घेण्याची कुणाची तयारी आहे का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

हंस आणि नीरक्षीर विवेक
हंसाला पाण्यातून दूध वगैरे अजिबात वेगळे काढता येत नाही. त्याला तेवढे ज्ञानही नाही. कमळाच्या देठामध्ये दुधासारखा पातळ पदार्थ असतो. हंस पाण्याखाली जाऊन कमळाचे देठ चोचीने अलगद चिरतो आणि देठातील हा पदार्थ शोषून घेतो. यालाच क्षीर असे म्हणतात. दूध असा त्याचा अर्थ नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

मी किती जगेन माहीत नाही...
वृक्षकोशात 12 हजार झाडांची माहिती आहे. महाराष्ट्रातच 400 प्रकारचे वृक्ष आहेत. वृक्षकोशाचे काम खूप मोठे आहे. एका वर्षात फार तर एक हजार झाडांची माहिती लिहून होईल. वृक्षकोश पूर्ण व्हायला बारा वर्ष लागतील. आता मी 82 वर्षांचा आहे. मी किती वर्षं जगेन माहीत नाही...आणि जगलोच तर काम करता येईल की नाही हेही माहीत नाही,अशी टिप्पणी चितमपल्ली यांनी केली.