आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगभरातील वाघांच्या संख्येत भारतच ठरला "शेर', देशात सर्वाधिक 2,226 वाघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रपूर - जगभरात वाघ आढळणाऱ्या १२ देशांच्या तुलनेत भारतच "शेर' ठरला आहे. जगात सर्वाधिक २ हजार २२६ वाघ एकट्या भारतातच आढळतात, तर उर्वरित १२ देशांमध्ये फक्त ७०० वाघ आहेत. जगभरातील या १२ देशांतील एकूण वाघांच्या संख्येपेक्षा जास्त अर्थात ७१८ वाघ ताडोबा, पेंच, कान्हा, मेळघाट या महाराष्ट्राशी संबंधित अभयारण्यातच आढळतात.
वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन ट्रस्टने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. सुमारे पाच महिन्यांपर्यंत चाललेला हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्व्हे मानला जातो. या सर्व्हेच्या विस्तृत आकलनासाठी वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन ट्रस्ट देश आणि १८ राज्यांमध्येही वन्यजीव अध्ययनाची तयारी करत असल्याची माहिती वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अनीश अंधेरिया यांनी दिली आहे.

ताडोबा-बोरमधून मेळघाटात वाघ
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघ वर्ध्याच्या बोर उद्यानातून थेट मेळघाटात जाऊन पोहोचल्याचे दिसून आले. शिवाय नागझिऱ्यातील वाघ उमरेड आणि उमरेड वनक्षेत्रातील वाघीण ब्रह्मपुरी वनक्षेत्रात आढळून आली.

चंद्रपुरात १२० वाघ
वाघांची गणना करताना तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बछड्यांची संख्या गृहीत धरली जात नाही. चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात ६० आणि मध्यवर्ती क्षेत्रात १५ वाघ आहेत. या दोन्ही भागांत ६८ बछडेही असल्याचे कॅमेऱ्यात दिसून आले. संरक्षित क्षेत्राबहेर ४८ वाघ आणि ११० बछडे असल्याचा दावा लाइफ कन्झर्व्हेशन ट्रस्टने केला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या आकेडवारीनुसार महाराष्ट्रात १९० वाघांची नोंदणी झाली आहे.

दोन हजार चौरस किमीत ६ हजार कॅमेरे
दोन हजार चौरस किलोमीटर क्षेत्रातील सर्व प्रकारच्या वन्यजीवांची संख्या जाणून घेण्यासाठी सहा हजार कॅमेरे लावण्यात आले होते. यासाठी दर दीड चौकिमीत प्रत्येकी दोन कॅमेरे बसवण्यात आले होते.

१५६ दिवस, ४ लाख छायाचित्रे, त्रिस्तरीय गणना
दोन हजार चौरस किलोमीटर भागात तीन स्तरांत ही गणना करण्यात आली. यात मुख्यत्वे कॅमेरा ट्रॅपिंग, जेनेटिक आणि फॉरेस्ट कनेक्टिव्हिटीला जोडण्यात आले. १९ डिसेंबर ते २१ एप्रिल या १५६ दिवसांच्या प्रक्रियेत वन विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांसह वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन ट्रस्टच्या सात वन्यजीव अभ्यासकांनीही भाग घेतला होता. यासाठी घेण्यात आलेल्या ४ लाख छायाचित्रांवरून वरील आकडेवारी गोळा करण्यात आली. वाघाच्या प्रजाती माहिती करून घेण्यासाठी त्याच्या शौचाची डीएनए चाचणीही करण्यात आली. शिवाय या संशोधनादरम्यान फॉरेस्ट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून मध्य भारताच्या वनांशी जोडणारे तसेच वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण अशा मार्गांचीही माहिती मिळाली.
बातम्या आणखी आहेत...