आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर, आयुक्तांची काटकसर! अधिकार्‍यांनी दोन वर्षांमध्ये वाहनांवर केला अत्यल्प खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराचे महापौर, महापालिका आयुक्त व स्थायी समिती सभापतींनी वाहन दुरुस्तीच्या खर्चात काटकसर करून शासकीय खर्चातील बचतीचा सकारात्मक पायंडा घातला आहे. महापालिकेतील अधिकारी-पदाधिकार्‍यांच्या वाहनांवर मागील दोन वर्षांतील अत्यल्प खर्चाच्या आकड्यांनी हे स्पष्ट केले.

आयुक्त अरुण डोंगरे यांचे वाहन दीड वर्षांपूर्वी खरेदी केले असले, तरी महापौर व स्थायी समिती सभापती यांचे वाहन दोन ते अडीच वर्षे जुने आहे. अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत महापालिकेतील पदाधिकारी व अधिकार्‍यांकडून वाहनांची निगा राखण्याबाबत दक्षता घेण्यात आली. आयुक्तांच्या वाहनावर मागील दीड वर्षांत सर्वांत कमी खर्च झाला. प्रत्येक महिन्याला आयुक्तांच्या वाहनाला डिझेलदेखील अगदी कमी वापरले जात असल्याची माहिती आहे. महापौरांच्या तुलनेत आयुक्तांच्या वाहनाला अंदाजे दीडशे लिटर कमी लागते. एलबीटी लागू झाल्यानंतर दोन वर्षांत महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम पडला. उत्पन्नाचे अपेक्षित उद्दिष्ट गाठणेदेखील महापालिका प्रशासनाला शक्य झाले नाही. त्याचा परिणाम महापालिकेतील प्रत्येक घटकावर पडतो आहे. उत्पन्न घटत असल्याने महापालिका प्रशासनाकडून वाहनांवर उधळपट्टी न करण्याचा चांगला शिरस्ता घालून दिला आहे. मागील अर्र्थसंकल्पात आढावा घेताना काटकसरीचे धोरण राबवणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, घोषणेच्या काही महिन्यांपूर्वीपासूनच प्रमुखांनी त्यावर अंमल केल्याचे खर्चाच्या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी शासकीय निधीची उधळपट्टी करीत असल्याचा सर्वसामान्य समज आहे. मात्र, महापालिका त्याला अपवाद असल्याचेच यातून स्पष्ट झाले आहे.