नागपूर - ‘सरासरीपेक्षा कमी पावसाचे अंदाज यंदा वर्तवण्यात अाला असला तरी तरी माध्यमाने चुकीच्या पद्धतीने विश्लेषण करून उगीचच घबराट (पॅनिक) निर्माण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. मात्र जनतेने फार चिंता करण्याची कुठलीही गरज नाही’, असा निर्वाळा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी दिला.
राष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘नीरी’त आयोजित कार्यक्रमासाठी डॉ. हर्षवर्धन नागपुरात अाले होते. मान्सूनबाबतचे अंदाज देशाने कितपत गांभीर्याने घ्यायचे, या प्रश्नावर बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी माध्यमांकडून मान्सूनच्या अंदाजाचे चुकीच्या पद्धतीने विश्लेषण करत अाहे, असा दावा केला. ते म्हणाले, ‘सरासरीपेक्षा थोडेफार कमी पावसाचे अंदाज आहेत. हवामान खात्याला वेळोवेळी ते मांडावे लागतात. सरकारला पुढील उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था आहे. मात्र, सध्या तरी फार काळजी करण्याचे कुठलेही कारण दिसत नाही. ती करूही नका. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी देश सज्ज आहे’, असे सांगत पंतप्रधान तर या घडामोडींबाबत सर्वात जास्त सतर्क असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जंक, फास्टफूड टाळाच
सध्या सुरू असलेल्या मॅगीच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डॉ. हर्षवर्धन यांनी जंक आणि फास्ट फूडच्या मागे न धावता जबाबदार ग्राहक होण्याचा सल्ला दिला. आपल्या खानपानाच्या नेमक्या गरजा काय आहेत. कुठले पदार्थ शरीरास फायदेशीर अथवा अपायकारक ठरू शकतात, याचा सारासार विचार करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने शाळा-महाविद्यालयांसह घरांमध्येही जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मोजमाप करणारी मोबाइल व्हॅन
वायुप्रदूषणाचे मोजमाप करणारी मोबाइल व्हॅन ‘नीरी’ने विकसित केली आहे. नागपुरातील प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी ती विकसित झाली असली तरी नीरीने वर्षभरात शहरातील प्रमुख शहरांमधील प्रदूषणाचे मोजमाप करण्याचा प्रकल्प हाती घेऊन सविस्तर अहवाल सादर करावा, अशी सूचना डाॅ. हर्षवर्धन यांनी केली. दरम्यान, सौर ऊर्जा प्रकल्पाच्या क्षेत्रात महाराष्ट्र सर्वात जास्त खर्च करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे उपस्थित होते.