आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेळघाटातील रस्त्यांना जिल्हा परिषदेचा ‘खो’; पुराने वाहून गेलेल्या रस्त्यांची स्थिती खराब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील वर्षी अतिवृष्टीने खरडून गेलेल्या मेळघाटातील रस्त्यांच्या दुरुस्तीला जिल्हा परिषदेकडून ‘खो’ दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेकडून मागणी करण्यात आलेल्या सहा कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मिळाला नाही. महाराष्ट्राच्या ग्रामविकास खात्यासोबतच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असताना मेळघाटातील रस्त्यांसाठी निधी मिळत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मेळघाटातील रायपूर-हतरू, सेमाडोह-हतरू, चुर्णी-रायपूर मार्ग तसेच बारातांडा ते परसापूर या राज्यमार्गाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. रस्ते उखडले, सहा पूल वाहून गेले. यामुळे मेळघाटात दळणवळणाची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यांची डागडुजी करण्यात आली, मात्र पूलच नसल्याने नागरिकांना पायपीटच करावी लागत आहे. वाहने जाणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे. रस्ते दुरुस्तीसाठी जिल्ह्याला 38 कोटी रुपयांचा निधी मिळाला. मात्र, त्यातून मेळघाटला वाटा मिळणार किंवा नाही, याची शाश्वती नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी मेळघाटातील रस्त्यांसाठी सहा कोटींची मागणी शासनाकडे केली होती. ग्रामविकास, वित्त मंत्रालय राष्ट्रवादीकडे असताना ठाकरे यांना निधी आणण्याचे कौशल्य साधता येत नसल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषदेतील रस्त्यांचा ‘एनओसी’वरून रंगलेला राजकीय वाद शासनापर्यंत पोहोचला होता. मंत्री जयंत पाटील व छगन भुजबळ यांनी मध्यस्ती करीत वाद निकालीदेखील काढण्याचे प्रयत्न केले; तरीही रस्त्यांचे भाग्य फळफळले नसल्याची स्थिती आहे.

पूल वाहून गेल्याने गेला होता दोघांचा प्राण
राज्यमार्गावरील पूल वाहून गेल्यानंतर मागील वर्षी दोन शिक्षकांना प्राण गमवावा लागला. वाहणार्‍या पाण्यामुळे पूल नसल्याची कल्पना न आल्याने अपघात घडला होता. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या बैठकांमध्ये सदस्यांनी रोषही व्यक्त केला होता. त्याचा कोणताही परिणाम पदाधिकार्‍यांवर पडल्याचे दिसून येत नाही.

नाममात्र निधी देऊन काढली समजूत
अध्यक्षांचे राजकीय वजन तर कमी झाले नाही ना, असा सवाल यामुळे विचारण्यात येत आहे. मागणी करण्यात आलेल्या सहा कोटींपैकी नाममात्र निधी देऊन शासनाने समजूत काढण्याचा प्रकार झाल्याचे स्पष्ट होत आहे.

दुरुस्ती झालेले रस्ते सांगता येणार नाहीत
मेळघाटातील रस्त्यांची मागील वर्षी दुरुस्ती केली. मात्र, नेमक्या कोणत्या रस्त्यांची दुरुस्ती झाली, हे सध्या सांगणे कठीण आहे. काही रस्त्यांची दुरुस्ती आमदारांच्या निधीतून झाली आहे. जिल्हा नियोजन समितीला 38 कोटी प्राप्त झाले असून, त्यातून निधी मिळण्याची अपेक्षा आहे.
सुरेखा ठाकरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद.