आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mental Illness News In Marathi, Nagpur, Divya Marathi

मानसिक आजारी ‘उपवरां’साठी हेल्पलाइन सुरू, मानसोपचार तज्ज्ञांनी घेतला पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - उपवर वधू-वरांमधील मानसिक व अन्य आजार लपवूनच त्यांची लग्ने उरकण्याकडे आई-वडिलांचा कल आढळून येतो. त्यामुळे लग्नानंतर उघडकीस येणा-या अशा आजारांची परिणती स्वाभाविकपणे घटस्फोटांमध्ये होते. केवळ या कारणांपायी होणा-या घटस्फोटांचे प्रमाण मोठे आहे.
त्यामुळे वैवाहिक जीवनातील भविष्यात निर्माण होणारा धोका टाळता यावा तसेच मानसिक आजारांनी ग्रस्त उपवर-वधूंना कुठलीही लपवाछपवी न करता जोडीदार शोधण्यात मदत मिळावी, या उदात्त हेतूने नागपुरातील डॉक्टर मंडळींनी पुढाकार घेत एक ऑनलाइन हेल्पलाइन सुरू केली आहे.
मानसिक आजार, मेंदूविकार तसेच जननेंद्रियांच्या समस्यांनी ग्रस्त उपवर-वधूंची संपूर्ण माहिती उपलब्ध करणारे ‘मनोमॅरेज डॉट कॉम’ हे कदाचित पहिलेच संकेतस्थळ ठरावे, असा दावा या उपक्रमाचे जनक व नागपुरातील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांनी केला. डॉ. जोशी यांच्यासह प्रसूतितज्ज्ञ डॉ. सुलभा जोशी, डॉ. सीमा दंदे तसेच डॉ. पिनाक दंदे या मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

डॉ. अविनाश जोशी म्हणाले, मानसिक आजारांवर उपचारासाठी माझ्याकडे येणा-या असंख्य मुला-मुलींच्या लग्नाची परिणती ही अखेर घटस्फोटांमध्ये झाल्याचे वास्तव मला बघायला मिळाले. लग्नापूर्वी मानसिक वा तत्सम आजार असलेल्या मुला-मुलींची माहिती लपवण्याकडेच कुटुंबीयांचा कल असतो. लग्न झाल्यानंतर असे आजार बरे होतात, अशी समजूत आजही आहे. मात्र, लग्नानंतर औषधोपचार बंद केले जातात आणि त्यानंतर आजार उघड होतात. त्यातून जोडीदार आणि संबंधित कुटुंबांमध्ये एकमेकांची फसवणूक केल्याची भावना निर्माण होते.

गोपनीयतेची काळजी
या संकेतस्थळावर युजर लॉगीन व पासवर्ड तयार करून संबंधित कुटुंबीयांना विनामूल्य नोंदणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे असे आजार असलेल्या वधू-वरांची माहिती गोपनीय राहण्यास मदत होणार आहे. नोंदणी करणा-या समदु:खी कुटुंबीयांनाच ती माहिती मिळू शकेल.

आम्ही सल्लाही देऊ
हे संकेतस्थळ एक प्रकारची हेल्पलाइनच आहे. त्याचा संबंधितांना लाभ व्हावा यासाठी आम्ही देशभरातील मानसोपचारतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञांना संपर्क करून या हेल्पलाइनची माहिती देत आहोत. स्थळांची माहिती घेऊन पालकांनी परस्पर एकमेकांशी संपर्क साधून अनुरूप जोडीदार शोधावेत. गरज वाटल्यास आमचा सल्ला घ्यावा.- डॉ. अविनाश जोशी, मानसोपचारतज्ज्ञ, नागपूर