आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता दुधाचेही संकट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पाऊस लांबल्याने उद्भवलेल्या संकटाच्या मालिकेत हिरव्या चार्‍याचे प्रमाणही घटले असून त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात रेशनिंगची स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.

शहरासह जिल्हाभर दुधाचे उत्पादन घटले, अशी ओरड आहे. खासगी स्तरावर सुरु असलेल्या डेअरींशिवाय शासकीय दूध संकलन केंद्रे व सहकार तत्त्वावरील दूध उत्पादक संघही या संकटातून सुटले नाहीत. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा ही सध्याची समस्या आहे. पाऊस नाही म्हणून हिरवा चारा नाही आणि हिरवा चारा नाही म्हणून दुभत्या जनावरांची पाहिजे तेवढी संख्या नाही, असे हे दुष्टचक्र आहे. त्यामुळे परंपरागत दुग्धव्यवसाय करणार्‍या काहींनी अख्खे पशुधनच विक्रीला काढले आहे.

अमरावती शहरात दोनशेवर खासगी दूध डेअरी व एक शासकीय दुग्धशाळा आहे. या दोन्ही यंत्रणांमार्फत साडे आठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहराला दुध पुरवठा केला जातो. आजघडीला शासकीय दुग्धशाळेत केवळ 2700 लीटर दूध संकलीत केले जाते. सकाळच्या सत्रात 1500 आणि सायंकाळच्या सत्रात 1200 लीटर दूध प्राप्त होते. गतवर्षी याच काळात यापेक्षा जास्त दूध प्राप्त होत होते, अशी दुग्धशाळेची माहिती आहे. दरम्यान संकलीत केल्या जाणार्‍या दुधाची त्याच दिवशी विक्री केली जात असल्याने दुग्धजन्य इतर पदार्थ तयार करून त्याची विक्री करण्याचे काम याठिकाणी करावे लागत नाही. याउलट, खासगी डेअरी चालवणारे दूध व दुग्धजन्य पदार्थांचीही विक्री करतात. दरम्यान, दूधाचे उत्पादनच कमी झाले असल्याने काही डेअरींमधून मिळणारे कलाकंद, रबडी, पेढा, मिल्ककेक असे पदार्थ सद्या हद्दपार झाले आहेत. दुसरीकडे दूधापासून तयार होणारे दही, ताक, पनिर, लोणी अशा पदार्थांचाही तुटवडा जाणवू लागला आहे.

मुंबईत बैठक : पावसाच्या विलंबामुळे उद्भवलेला जनावरांच्या वैरणीचा मुद्दा शासनानेही गंभीरपणे घेतला आहे. या मुद्दांवर संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीला स्थानिक पातळीवरील प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी व जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी रवाना झाले आहेत.
तुटवडा आहे, पण भाववाढ नाही
मागणी व पुरवठ्याच्या सूत्रानुसार एखाद्या बाबीचा तुटवडा झाला की लगेच भाववाढ होते. परंतु दुध किंवा दुग्धजन्य पदार्थांबाबत तसे झाले नाही. शासकीय डेअरीमधून दिले जाणारे दूध 32 रुपये तर खासगी डेअरीमधून ते 40 ते 42 रुपये प्रती लीटर दरानेच विकले जात आहे.
पाकीटचे घेणार त्याला...
काही जण पाकीटबंद दूध वापरतात. परंतु स्वाद, गुणवत्ता, किंमत, आरोग्य अशा अनेक कसोट्यांवर हे दूध खरे उतरत नसल्याची धारणा असल्याने बहुतेकांची पसंती म्हैस व गायीच्या दुधालाच असते. त्यामुळे पाकीटबंद दूध वापरणार्‍यांना या तुटवड्याची झळ पोहोचणार नाही. मात्र, इतरांची चांगलीच पंचईत होणार आहे.
मागणीनुसार चारा डेपो सुरू करणार
दुधाचे उत्पादन घटले, अशी बाब कानावर आली आहे. त्याचवेळी काही जणांनी जनावरांसाठी चारा डेपो सुरु करावेत, अशी मागणी केली आहे. शासनही या विषयावर गंभीर आहे. मागणीनुसार आपल्या जिल्ह्यातही चारा डेपो सुरू केले जातील.
राहुल महिवाल, जिल्हाधिकारी, अमरावती.