आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थप्पड प्रकरण: काँग्रेसमध्ये अस्वस्थता; धोत्रे कोतवालीतून कंट्रोल रूममध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- दहीहंडीच्या कार्यक्रमात आमदार रावसाहेब शेखावतांना पोलिस आयुक्त अजित पाटील यांच्यासमक्ष मारहाण झाल्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसेल, तर हे आपले संयुक्त अपयश आहे, अशी भावना कॉँग्रेस आमदारांमध्ये निर्माण झाली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि धामणगावरेल्वे मतदारसंघाचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी हे पक्षाचेच अपयश असल्याचे मत ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केले.

जन्माष्टमीच्या दिवशी सायंकाळी राजकमल चौकातील दहीहंडी कार्यक्रमात गजेंद्र उमरकर या युवकाने रावसाहेबांना मारहाण केली होती. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुकारलेला ‘अमरावती बंद’, आमदारांनी घेतलेली जिल्हाधिकार्‍यांची भेट, पालकमंत्र्याकडे करण्यात आलेल्या तक्रारींसोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची भेटही घेण्यात आली होती. मात्र, मंत्रालयीन स्तरावर पोलीस आयुक्तांविरोधात अद्याप तरी कारवाई दृष्टिपथात नाही. याप्रकरणी वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, केवलराम काळे आणि रावसाहेब शेखावत या चार आमदारासंमवेत राज्यातील काँग्रेसचे आणखी आमदारही मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना भेटले आहेत. आपलाच सत्तारूढ पक्ष तक्रारींची दखल घेत नसल्याचे शल्य आमदारांना टोचत आहे.

धोत्रे कोतवालीतून कंट्रोल रूममध्ये
आमदार शेखावत मारहाणप्रकरणी कोतवालीचे ठाणेदार अशोक धोत्रे यांना तातडीने नियंत्रण कक्षात स्थानांतरित केले आहे. कोतवालीच्या खुफिया विभागाच्या दोन कर्मचार्‍यांची मुख्यालयात बदली करण्यात आली असून, शेखावतांच्या अंगरक्षक हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त पाटील यांनी गुरुवारी ही कारवाई केली .

शेखावत यांना 29 ऑगस्टला दहीहंडीच्या बक्षीस वितरण समारंभात गजेंद्र उमरकरने मारहाण केली होती. घटनास्थळ कोतवाली ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे बंदोबस्त प्रमुख म्हणून ठाणेदार धोत्रे यांची ती जबाबदारी होती. या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त संजय लाटकर यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीअंती पोलिस आयुक्तांनी आज हा निर्णय घेतला. ठाणेदार धोत्रे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. खुफिया पोलिस हवालदार सुनील लासूरकर (ब. क्र. 1166), पोलिस नाईक रवी लोंदे (ब. क्र. 870) यांना कोतवाली ठाण्यातून मुख्यालयात बदलीवर पाठवण्यात आले. याचवेळी शेखावतांचे अंगरक्षक राजेंद्र वाघमारे (ब. क्र. 407) यांना निलंबित करण्यात आले.

मुख्यमंत्री संतापले आहेत
पोलिस आयुक्तांच्या बदलीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना आमचे म्हणणे पटले. त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई नाही, ही वस्तुस्थिती आहे.
-वीरेंद्र जगताप, काँग्रेस आमदार