आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण: रावसाहेब शेखावतांवरील हल्ला, अमरावती चिंतित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - लहान-लहान प्रकाराकडे पोलिस प्रशासनाने कानाडोळा केला तर पुढे त्याचा कधीही मोठा भडका उडू शकतो, हे शांतताप्रिय अमरावतीत माजी राष्ट्रपतीपुत्र आमदारावर खुद्द पोलिस आयुक्तांच्या डोळ्यादेखत झालेल्या हल्ल्याने सिद्ध झाले आहे. आमदार रावसाहेब शेखावत यांचा उद्धार करणारा मजकूर लिहिलेली टोपी आणि टी-शर्ट घालून तब्बल दोन वर्षांपासून शहरात फिरणार्‍या माथेफिरू तरुणाला पोलिसांनी वेळीच आवरले असते तर कालची घटना टाळणे सहज शक्य होते. या प्रकारानंतर रावसाहेबांनी वर्तविलेली षड्यंत्राची शंका येथील राजकीय पुढार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. यातून पोलिस प्रशासन आणि राजकारणासाठी खालची पातळी गाठणार्‍या पुढार्‍यांनी धडा घेतला नाही तर अमरावतीची शांतता भंग व्हायला वेळ लागणार नाही.

देशाला नेतृत्व देणार्‍या अनेक नामवंतांच्या अमरावतीला झाले तरी काय असा प्रश्न गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे उपस्थित झाला आहे. येथील एका नगरसेविकेच्या पतीने महापालिकेतील अधिकार्‍याला केलेली मारहाण, आपल्याच जुन्या कार्यकर्त्यावर तो विरोधकांचे बॅनर शहरात लावतो म्हणून पिस्तूल रोखून धमकावल्याचा रावसाहेब शेखावत यांच्यावर झालेला आरोप, शेजारच्या बडनेरामध्ये मारहाण करून उपमहापौरावर पिस्तूल रोखल्याचा तेथील अपक्ष आमदारावर झालेला आरोप आणि काल भरचौकात व्यासपीठावर पोलिस आयुक्तांच्या डोळ्यादेखत रावसाहेबांवर झालेला हल्ला हे सर्व प्रकार अमरावतीला चिंतेत टाकणारे आहेत.

अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून ज्या अनुचित घटना घडत आहेत, त्याला कुठे तरी स्थानिक पातळीवरच्या गलिच्छ राजकारणाचे कारण नाकारता येत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने आपल्याच विद्यमान आमदाराला खड्यासारखे बाजूला सारून रावसाहेबांना मैदानात उतरविले होते. बंडाचे निशाण फडकावून रिंगणात उतरलेले डॉ. सुनील देशमुख यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शेखावत कुटुंबासह काँग्रेसला अस्वस्थ करून सोडले होते. अगदी अल्प फरकाने विधानसभेत पोहोचलेले रावसाहेब शेखावत यांच्यापुढे विजयाच्या पहिल्या दिवसापासूनच दुसर्‍यांदा विधानसभेत पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे. या आव्हानाशी दोन हात करीत गेल्या तीन-चार वर्षांत रावसाहेबांनी काँग्रेसमध्ये बर्‍यापैकी जम बसविला. दीर्घ काळापासून काँग्रेस सांभाळणारी मंडळी आज बाजूला पडली आहे. रावसाहेब शेखावत यांच्याशिवाय अमरावतीमध्ये काँग्रेसचे पानही हलत नाही, अशी येथील सद्यस्थिती आहे. असे असताना साध्या बॅनरच्या कारणावरून जुन्या कार्यकर्त्यावर पिस्तुल रोखल्याचा आरोप रावसाहेबांवर व्हावा, हे अनेकांना कोड्यात टाकणारे आहे. काँग्रेसमध्येही सर्व काही ठीकठाक सुरू आहे असे म्हणता येत नाही. असे नसते तर हल्ला करणारा माथेफिरू कार्यकर्त्यांची नजर चुकवून रावसाहेबांना गाठूच शकला नसता. हल्लेखोर तरूण रावसाहेबांच्याच संस्थेत शिकून नापास झालेला विद्यार्थी आहे. गेल्या दोन वर्षांपासून कधी रावसाहेबांचा उद्धार करणारा मजकूर लिहिलेली टोपी घालून तर कधी टी-शर्ट परिधान करून तो शहरात फिरत होता. हा तरूण कोणतेही कृत्य करू शकतो किंवा त्याचा वापर कुणीही करून घेऊ शकतात, एवढीही शंका पोलिसांना येऊ नये, हे येथील पोलिस दलाचे अपयशच म्हणायला हवे. काल परवाच एका अपक्ष आमदाराने उपमहापौरांवर भररस्त्यात पिस्तुल रोखले. या प्रकारामागे राजकीय वर्चस्वाची लढाई हे एकमेव कारण होते, हेही पोलिसांना माहीत होते. तरीही पोलिसांनी काहीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळेच पोलिस आयुक्तांच्या शेजारी असलेल्या रावसाहेबांवर माथेफिरू तरूणाने हल्ला करून अमरावती पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली. आता अमरावतीकर आणि येथील राजकीय पुढार्‍यांचीच जबाबदारी वाढली आहे. अमरावतीची शांतता कायम राखायची की भंग होऊ द्यायची, हे पोलिसांच्या नव्हे तर अमरावतीकरांच्या हातात आहे. किमान रावसाहेब शेखावतांवरील हल्ल्याने तरी हे सिद्ध केले आहे.