आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MLA Raosaheb Shekhawat Attack Reaction In Amravati

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पोलिस आयुक्त हटाओ’चा नारा, शेखावत यांच्यावरील हल्ल्याचे शहरात पडसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावतीचे आमदार रावसाहेब शेखावत यांना दहीहंडी उत्सवात पोलिस आयुक्तांसमक्ष एका युवकाने थप्पड लगावल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारीही शहरात उमटले. संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी आठ वाजेपासूनच राजकमल चौकात एकत्र येऊन ‘अजित पाटील मुर्दाबाद’, ‘पोलिस प्रशासन हाय हाय’, ‘आयुक्त हटाओ, शहर बचाओ’, अशा घोषणा देत तीव्र असंतोष व्यक्त केला. विद्याभारती महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारीही यामध्ये सहभागी झाले होते.

हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी राजकमल चौकातून रॅली काढण्यात आली. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडली असून लोकप्रतिनिधींवर उघड हल्ले होत आहेत. त्यांच्या सुरक्षेविषयी पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहेत, असे जिल्हाधिकार्‍यांपुढे स्पष्ट करण्यात आले. पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. महापौर वंदना कंगाले, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय अकर्ते, पक्षाचे नेते वसंतराव साऊरकर, शेख जफर, बबलू शेखावत, विलास इंगोले, सुगनचंद गुप्ता, संजय मापले, राजा बांगडे, सागर देशमुख, अर्चना सवाई, डॉ. दिव्या सिसोदे, डॉ. कांचन ग्रेसपुंजे, देवयानी कुर्वे तसेच पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी होते.


युवक काँग्रेसचे रस्त्यावर झोपून आंदोलन
आमदार शेखावतांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गाड्यांपुढे झोकून देऊन रोष प्रकट केला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली.

दुपारपर्यंत शहर बंद

मारहाणीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमुळे शहरातील बाजारपेठेवर दुपारी 3 पर्यंत परिणाम जाणवला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. व्यावसायिकांनी दुपारनंतरच प्रतिष्ठाने उघडली. बंदला इतवारा बाजार रिटेल किराणा, अमरावती रिटेल किराणा संघटना, अमरावती चेंबर ऑफ कॉर्मस, महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीने पाठिंबा दिला. युवक काँग्रेस, एनएसयूआय तसेच महिला काँग्रेसच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता.

मते-मतांतरे

साडी-चोळीचा आहेर
पोलिस आयुक्तांसमोर ही घटना घडली. त्यामुळे त्यांनी महिला कॉंग्रेसचा साडी-चोळीचा आहेर स्वीकारावा. आयुक्तांनी बांगड्या घालाव्यात. आयुक्तांना शहरात राहण्याचा काही-एक अधिकार उरलेला नाही. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी. अर्चना सवाई, महिला काँग्रेस अध्यक्ष.

शहराची सुरक्षा धोक्यात
पोलिसांचा चोख बंदोबस्त फक्त दिखावाच होता. पोलिस आयुक्तांसमोरच माथेफिरू युवक स्टेजवर येऊन हल्ला करतो, यात राजकारण दडले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा पश्न हाताबाहेर गेला आहे. शहराला धोका निर्माण झाला असून आयुक्तांनी स्वत: येथून परतावे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी तरी आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात यावी. वंदना कंगाले, महापौर.

पोलिसांची अकार्यक्षमता
चोख बंदोबस्तात हल्ला ही लाजीरवाणी बाब आहे. त्यामुळे पोलिस किती सतर्क आहेत, याची जाणीव झाली. सार्वजनिक ठिकाणी लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, तर सामान्य नागरिकांचा देवच पाठीराखा आहे. हा भ्याड हल्ला पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे घडला. डॉ. अनिल बोंडे, आमदार, मोर्शी

पोलिसांचा नाकर्तेपणा कारणीभूत
रावसाहेबांविरुद्ध 2003 पासून हा माथेफिरू युवक अपशब्द वापरत होता. पोलिसांच्या नाकर्तेपणाची परिणती मारहाणीत झाली. निवडणुकीच्या तोंडावर आमदारांविरुद्ध षड्यंत्र रचले जात आहे. पोलिसांनी मास्टमाइंड शोधून काढावा. वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगावरेल्वे.