आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mla Ravi Rana Beaten Municipal Corporation Commissioner In Maravati

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार रवी राणा यांची उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे यांना मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - बडनेर्‍याचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मंगळवारी उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे यांना मारहाण केल्याने राजकीय वतरुळात खळबळ उडाली. राजापेठ परिसरात तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. रस्त्यांवरील खड्डय़ांवरून राष्ट्रवादी काँग्रेस व युवा स्वाभिमानमध्ये हा वाद उफाळून आला.

आमदार राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने सध्या बडनेरा मतदारसंघातील मार्गांवर असलेल्या रस्त्यांवर मुरुम टाकण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी 2 वाजता आमदार राणा व त्यांचे काही सहकारी शारदानगर परिसरातील रस्त्यातील खड्डय़ांत मुरुम टाकत होते. याचवेळी उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे महापालिकेत येण्यासाठी निघाले. त्यावेळी शारदानगरमध्ये राणा आणि उपमहापौरांची मुरुम टाकण्यावरून शाब्दिक चकमक उडाली. वर्‍हाडे यांनी राणांना शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या राणा यांनी वर्‍हाडेंना मारहाण केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि रवी राणा यांच्यातील राजकीय मतभेद यापूर्वी अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. मंगळवारी दुपारी झालेल्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. 3 वाजता वर्‍हाडे यांच्यासह शहराध्यक्ष अँड. किशोर शेळके, नगरसेवक चेतन पवार, गटनेते अविनाश मार्डीकर राजापेठ ठाण्यावर धडकले. राणा यांनी पिस्तुल रोखून मारहाण केल्याची तक्रार उपमहापौर वर्‍हाडे यांनी पोलिसांत दाखल केली आहे.

वर्‍हाडेंनी एकेरी शब्द वापरले
शहरातील खड्डे बुजवण्यासाठी युवा स्वाभिमानने अभियान हातात घेतले. पाऊस सुरू असूनही आम्ही स्वत: कार्यकर्त्यांसह रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम करीत आहोत. दुपारी 2 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास उपमहापौर वर्‍हाडे आले व त्यांनी ‘खड्डे बुजवू नका,’ असे सांगितले. त्यांनी मला ‘अरे, तुरे’ अशा एकेरी शब्दांनी संबोधले. मात्र, आम्ही त्यांना ‘कामात अडथळा आणू नका, काम करू द्या,’ अशी विनंती केली. मारहाण केली नाही. शहरातील विकासकामात हे लोक अडथळा निर्माण करतात. ही बाब योग्य नाही. रवी राणा, आमदार, बडनेरा

राणांनी लाथ मारली, पिस्तुल रोखली
स्वराज ठाकरे या सहकार्‍याच्या दुचाकीने महापालिकेत चाललो होतो. शारदानगरात आमदार राणा यांनी खाली पाडले, लाथ मारली व पिस्तुल रोखली. नंदकिशोर वर्‍हाडे, उपमहापौर, अमरावती