आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या जाहिरातीत नरेंद्र मोदींची छबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशीम - आधी महायुतीत जाण्यास स्पष्ट नकार व नंतर महायुतीतील पक्षांचे नेते असलेल्या नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा, अशी दुहेरी खेळी खेळणार्‍या राज ठाकरेंच्या मनसेने आता मते मिळवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. मनसेच्या उमेदवारांच्या जाहिरातीत मोदी यांचे छायाचित्र झळकू लागले आहे.

यवतमाळचे मनसेचे उमेदवार राजू पाटील यांची ही जाहिरात सोशल मीडियावर सर्रास फिरत आहे. या मतदारसंघात शिवसेनेने भावना गवळी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता मनसे व शिवसेना वाद पेटला आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

दरम्यान, याबाबत आपल्या उमेदवाराला समज देण्यात येईल, अशी हमी मनसेतर्फे दिल्याची माहिती निवडणूक आयुक्त संपत यांनी दिली.

मतदारांनी मनसेला निवडून दिले तरी आम्ही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार आहेत, असा स्पष्ट उल्लेखही मनसेच्या पोस्टर आणि बॅनरवर करण्यात आला आहे. मात्र, त्यावर मोदींचे छायाचित्र नाही. मोदींचे छायाचित्र असलेली मनसेची जाहिरात केवळ फेसबूक, व्हॉट्सअपच फिरत आहे.

निवडणूक आयोगाकडे तक्रार
भाजपने या बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या जाहिरातीचे प्रकाशक, मुद्रक आणि उमेदवार यांच्यावर आचारसंहिता भंग केली म्हणून कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

भाजपला नव्हे मोदींना पाठिंबा
मोदींचे विकास कार्य गुजरातच्या बाहेर सांगणारे राज ठाकरे हे पहिले नेते आहेत. त्यामुळेच पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून त्यांनी प्रतिमा तयार झाली. भाजपलाही हे स्वीकारावे लागले ते केवळ राज यांच्यामुळेच. आमचा भाजपला नव्हे तर मोदींना पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांचे छायाचित्र आणि नाव काढणार नाही. - आनंद गडेकर, मनसे, जाहिरात प्रकाशक, वाशीम

हा एक प्रकारचा भ्रष्टाचार
ज्या शिवसेना-भाजपच्या विरोधात निवडणूक लढवायची आणि त्यांच्याच नेत्यांचे छायाचित्र जाहिरातीत छापायचे, हा एक प्रकारचा भ्रष्टचार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन मनसेला निवडणुकीत बाद करावे. - डॉ.सुधीर कंवर, जिल्हा प्रमुख, शिवसेना वाशीम.