आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती - जनतेला पिण्यासाठी पाणी नाही, शेतीमालाला भाव नाही, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही, मुली-महिला सुरक्षित नाहीत.. हा राज्यातील जनतेचा हक्कभंगच आहे. हा हक्कभंग कुणी केला? याचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार व सरकारने द्यावे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी अमरावतीच्या सभेत सरकारवर तोफ डागली. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेनंतर लोअर परेलमधील इंडिया बुल्सच्या इमारतीची तोडफोड करण्यात आली. ते मनसेचे कार्यकर्ते असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तर, आज सकाळी अमरावतीतील इंडिया बुल्सच्या कार्यालयावर १५- २- जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचे सांगण्यात येते. राज ठाकरे यांनी अमरावतीमध्ये बोलताना इंडिया बुल्स कपंनीला शेतक-यांचे पाणी दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तोडफोड झाल्याचे सांगण्यात आले.
विदर्भातील सिंचन घोटाळ, विधानसभेत पोलिसाला झालेली मारहाण, हक्कभंग, शेतकरी आत्महत्या, परप्रांतीयांची घुसखोरी अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी सत्ताधार्यांचा खरपूस समाचार घेतला. राज म्हणाले, पोलिस अधिकार्याला मारहाणीचा प्रकार चुकीचाच आहे. आज पोलिसाला मारले उद्या हे लोक न्यायाधीशांनाही मारतील. परंतु मारहाण प्रकरणाचेही सरकारने राजकारणच केले. मनसेसह केवळ दोन आमदारांवर गुन्हे दाखल झाले. युतीच्या निलंबित तीन आमदारांना तसेच सत्ताधारी आमदारांनाही कारवाईपासून दूर ठेवले. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजही सरकार दाखवत नाही. दबावापुढे झुकून उद्या कदाचित आमदारांचे निलंबन मागेही घेतले जाईल,’ असे भाकीतही त्यांनी वर्तवले.
प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा
दुष्काळामुळे जनावरांची होरपळ होत आहे. त्यांच्यासाठी मनसेतर्फे चारा छावण्या सुरू केल्या आहेत. शेतकर्यांनी पोटच्या मुलांप्रमाणे वाढवलेली ही जनावरे खाटकांकडे जाऊ नयेत, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा सुरू करणार आहोत. त्यावर लवकरच नियोजन केले जाईल, अशी घोषणा राज यांनी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.