आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना मारहाण अयोग्य; राम कदम यांच्यावर राज ठाकरे संतप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - महाराष्ट्राच्या विधिमंडळ परिसरात पोलिस अधिका-याला झालेल्या मारहाणीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. सध्या विदर्भ दौ-यावर असलेल्या राज यांनी दोषी आमदारांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे.

पोलिस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांना विधिमंडळ परिसरात पाच आमदरांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाण करणा-या आमदारांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांचेही नाव आहे. त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार असा प्रश्न केला असता, ते म्हणाले पोलिसांवर हात उगारणे निषेधार्ह्यच आहे. लोकप्रतिनिधीने पोलिस आणि सरकारी अधिका-यांवर हात टाकणे योग्य नाही. आजच्या प्रकरणात आमच्या पक्षाचे आमदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. कारण विधिमंडळ परिसरात ही मारहाण झाली आहे. या प्रकरणाबाबत पक्षाची अधिकृत भूमिका आमदार बाळा नांदगावकर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी पक्ष स्थापनेपासून कायम पोलिसांची बाजू घेतलेली आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबईत झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलिसांना मारहाण करण्यात आली होती. महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला होता त्यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटीहून आझाद मैदानापर्यंत भव्य मोर्चा काढून पोलिसांची पाठराखण केली होती. पोलिसांचे मनोबल वाढवण्याची गरज व्यक्त करत त्यांनी, गृहमंत्री आर.आर.पाटील आणि मुंबई पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.