आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नंबर पोर्टेबिलिटी’ ठरली अमरावती पोलिसांची डोकेदुखी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मोबाइलवरून एसएमएस पाठवून त्रास देणारे, मोबाइल इंटरनेटचा वापर करून आर्थिक गुन्हे करणारे आणि पोलिसांच्या ‘रडार’वर असणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेत त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करताना मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचा मुद्दा तपास यंत्रणेसाठी व मोबाइल कंपन्यांसाठी काही प्रमाणात डोकेदुखीचा विषय ठरत आहे. त्यामुळे एखाद्या नंबरची माहिती काढण्यासाठी पोलिसांना सर्वच कंपन्यांकडून माहिती मागवावी लागते.

आज एखाद्या कंपनीची सेवा घेत असलेला ग्राहक काही तासांमध्ये एका कंपनीतून दुसर्‍या कंपनीचे नेटवर्क वापरू लागतो. अशावेळी त्याने केलेले कॉल्स, एसएमएस, मोबाइल डेटाचा वापर, त्यातून केलेले आर्थिक व्यवहार, नेट बँकिंगचा तपशील आदी मिळवताना तपास अधिकार्‍यांना कसरत करावी लागते. कोणता क्रमांक कोणत्या मोबाइल कंपनीशी संबंधित आहे, हे पोलिसांना ठाऊक नसते. त्यामुळे त्यांना सर्वच कंपन्यांना ई-मेल किंवा पत्राने त्या त्या क्रमांकाची माहिती मागवावी लागते. परिणामी, पोलिसांचेही काम वाढते. इतकेच नव्हे, तर पोलिसांना संदेश मिळाल्यानंतर प्रत्येक मोबाइल कंपनीच्या अधिकार्‍यांनाही हा क्रमांक आपल्या कंपनीचा तर नाही ना, याचा शोध घ्यावा लागतो.

आर्थिक स्वरूपाचे गुन्हे करून आपला बचाव करण्यासाठी काही जण पोर्टेबिलिटीचा गैरवापर करतात. हाणामारी, चोरी, खून, दरोड्यासारख्या गुन्ह्यांमध्ये साक्षीदार, पुराव्यांची जुळवाजुळव करता येते; परंतु ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांमध्ये आरोपीला शिक्षा मिळावी म्हणून भक्कम पुरावे तपास यंत्रणेला गोळा करावे लागतात. त्यातही सायबर लॉटरी, एसएमएस लॉटरी, बक्षीस लागल्याच्या कॉल्सच्या माध्यमातून होणारी फसवणूक, मोबाइल अकाउंट हॅकिंग असे तंत्रज्ञानसंबंधी गुन्हे वाढत आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये मोबाइल कंपन्यांकडून मिळणारा प्रमाणित डाटा पुरावा ठरतो. एमएनपीची सुविधा उपलब्ध झाल्यापासून तपास यंत्रणा आणि कंपन्यांचे अधिकारी अशा दोघांसाठी बरेचदा ही बाब डोकेदुखी ठरत आहे.
कंपन्या सहकार्य करतात
एखाद्या गुन्ह्यात मोबाइल क्रमांकाचा तपशील पाहिजे असेल, तर आम्ही आता सर्वच कंपन्यांना त्या क्रमांकाची माहिती देतो. तो क्रमांक ज्या कंपनीचा असेल, ती कंपनी आम्हाला त्याच्याकडे उपलब्ध असलेला डाटा देते. एखादा क्रमांक एका कंपनीतून दुसर्‍या कंपनीत ‘पोर्ट’ झाला असेल, तर नंबर ‘पोर्ट’ होण्याअगोदरची कंपनी त्यांच्याजवळ असलेला डाटा पाठवते व ‘पोर्ट’ झाल्यानंतर क्रमांक ज्या कंपनीची सेवा घेत असेल, ती कंपनी त्यांच्याजवळ असलेला डाटा पाठवते.
-संजय लाटकर, पोलिस उपायुक्त