वर्धा - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. वाराणसीमध्ये काँग्रेस मोदींच्या विरोधात कोणाला मैदानात उतरवायचे यासाठी काथ्याकूट करीत आहे, त्याची खिल्ली उडवत ते म्हणाले, मोदींवर उपाय शोधण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा देशापुढील समस्या सोडवण्याचे काम करा.
केंद्रीय कृषिमंत्री महाराष्ट्राचे असून राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप मोदींनी केला. शरद पवारांवर तोफ डागताना ते म्हणाले, सरकारला शेतक-यांशी देणेघेणे उरलेले नाही. त्यांनी 'किसान' संपवला आता 'जवान'ही संपवतील. भाजपच्या काळात शेतक-यांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. या सभेला पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
भाजपची सत्ता आली तर, कापूस उत्पादक शेतक-यांसाठी 'फाइव्ह एफ' फॉर्मूला देण्याचा दावा मोदींनी केला. ते म्हणाले, जिथे कापूस आहे, तिथेच धागा तयार झाला पाहिजे. जिथे धागा आहे तिथेच कपडा आणि रेडिमेड कपडे तयार झाले पाहिजे आणि फॅशनही तिथेच तयार झाली पाहिजे. मात्र, काँग्रस सरकारला याची जाणीव नाही.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- भाजप फाइव्ह एफ फॉर्मूला देणार
- काँग्रेसला शेतक-यांच्या परिस्थितीशी देणे घेणे नाही. शेतक-यांना दिल्या जाणा-या कर्जावरील व्याज हे अव्वाच्या सव्वा लावले जाते.
- शासनाच्या दुर्लक्ष्यामुळेच शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतक-यांना पाणी पाहिजे. वाजपेयी सरकारने गंगेला - कावेरीशी जोडण्याचा कार्यक्रम आखला होता. मात्र, या सरकारला याचे भान नाही.
- सुक्ष्म जलसिंचन, ड्रीप यावर लक्ष्य द्यावे लागणार आहे.
- शेतक-याने जोड धंदे केले पाहिजे. मत्स्यपालन, पशुपालन, कुकुटपालन केले पाहिजे.
- शेतमालाला भाजपच्या काळात योग्य मोबदला मिळेल.
- भाजपची सत्ता आली तर, शेतक-यांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागणार नाही.