आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Should Be Prime Minister Or Not All Depend On BJP, Say Sangh

मोदींना पंतप्रधान करावे की नाही हा भाजपचा अंतर्गत प्रश्‍न, संघाचा हस्तक्षेप नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - ‘भाजपचे प्रचारप्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करावे की नाही हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे,’ असे स्पष्ट करत राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाने बुधवारी भाजपच्या राजकीय निर्णयात हस्तक्षेप करत नसल्याचा दावा केला.


अमरावतीत दोन दिवसांपासून संघाच्या प्रांत प्रचारकांची बैठक सुरू आहे. त्यासाठी राजनाथसिंह, विहिंपचे नेते प्रवीण तोगडिया, अशोक सिंघल आदी नेत्यांनी हजेरी लावली आहे. मात्र निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठीच ही बैठक होत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. या पार्श्वभूमीवर संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, संघाच्या दरवर्षी तीन प्रमुख बैठका होत असतात, त्यापैकीच ही प्रांत प्रचारकांची एक बैठक आहे. या बैठकीत केवळ कामकाजाचे मूल्यांकन या विषयावरच चर्चा होते. हरिद्वार येथे झालेल्या संतांच्या बैठकीत जे मुद्दे चर्चेला आले होते ते सर्व मुद्दे अमरावतीच्या बैठकीत असल्याचे ते म्हणाले.


दरम्यान, बैठकीत सहभागी होण्यापूर्वी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह म्हणाले की, मी केवळ भेटीसाठी आलो आहे. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही. आपण संघाच्या प्रमुख प्रचारकांशी केवळ देशातील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपची निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा समविचारी संघटनांमध्येही उत्तम समन्वय असल्याचेही राजनाथ यांनी सांगितले.


वाढदिवस साजरा करणार नाही
राजनाथ यांचा बुधवारी वाढदिवस होता. मात्र उत्तराखंडमध्ये झालेल्या महाप्रलयामुळे वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘रालोआ’ला सोडचिठ्ठी दिली आहे, त्याचा काय परिणाम होईल? या प्रश्नावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.


असेही मीडियाप्रेम
राजनाथ यांना 8 ब्लॅक कॅट कमांडोंची विशेष सुरक्षा आहे. म्हणूनच माध्यमांच्या प्रतिनिधींना विमानतळापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावरच अडवण्यात आले होते. मात्र गाडीत बसून निघून जाताना रस्त्याच्या कडेला उभे असलेले प्रतिनिधी पाहून राजनाथसिंह थांबले व संवाद साधला.