आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Slams Pawar For Farmers\' Suicides In Amravati

अशोक चव्हाणांच्या उमेदवारीवरून मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र, एका दिवसात महाराष्ट्रात तीन सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती / नांदेड - महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवरुन भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मोदी म्हणाले, 'देशाच्या कृषिमंत्र्यांकडे क्रिकेटवर बोलण्यासाठी वेळचवेळ आहे. मात्र, शेतकर्‍यांना वाचवण्याची त्यांना गरज वाटत नाही.' अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. मोदी आज (रविवार) महाराष्ट्र दौर्‍यावर होते. अकोला, अमरावती आणि नांदेड येथे त्यांच्या प्रचारसभा झाल्या.
विदर्भात शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत, असे सांगत आता महाराष्ट्राला पवार आणि काँग्रेस मुक्त करण्याचे आवाहन मोदींनी केले. या सभेत मोदींनी प्रथमच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांचे नाव घेतले. त्यामुळे शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला.
मुंबईसह महाराष्ट्रात मोदींच्या अनेक सभा झाल्या मात्र, एकाही सभेत त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेतले नाही. याबद्दल शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली नसली तरी, त्यांच्या मनातील खदखद त्यांनी व्यक्त केली होती. मनसेचे खासदार निवडूण आले तर ते पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा देतील, असे म्हणणारे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र, महाराष्ट्रात येऊन बाळासाहेबांचे नाव घेत नसल्याबद्दल सुनावले होते. आज अमरावती येथील सभेत मोदी म्हणाले, 'महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने लोकसभेत पाठवणे हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.'

दोषी आमदार - खासदारांवर कारवाई करणार - मोदी
नांदेड येथील प्रचार सभेत अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवरुन मोदींनी काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, 'दिल्लीतील पत्रकार परिषदेत आदर्श घोटाळ्यात ज्यांचे नाव आहे त्यांच्यावर कारवाई करु असे, सांगितले आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली.' अशी कारवाई करायची होती का, असा सवाल मोदींनी केला. यावेळी मंचावर भाजपनेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष दवेंद्र फडणवीस, रिपाई नेते रामदास आठवले यांची उपस्थिती होती.
कारगिल शहिदांच्या कुटुंबांना ज्यांनी लुटले त्यांना आम्ही सत्तेत आल्यानंतर सोडणार नाही, असे सांगत मोदी म्हणाले, 'भाजपची सत्ता आल्यानंतर दोषी आमदार - खासदारांवर कडक कारवाई केली जाईल. त्यात भेदभाव केला जाणार नाही.'
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे
परदेशातील काळेधन परत आणण्याचे आश्वासन.
काँग्रेस आता देशवासीयांच्या डोळ्यात मिरची टाकणार.
काँग्रेसच्या घोषणपत्रावर टीका.
शेतक-यांच्या भल्यासाठी महायुतीला मतदान करा.