आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात काँग्रेसला सहा जागांवर विजय मिळेल : मोहन प्रकाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विदर्भातील 10 जागांपैकी 7 जागा सध्या कॉँग्रेसकडे आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यापैकी 6 ठिकाणी कॉँग्रेसच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे भाकित कॉँग्रेसचे महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना केले.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची लाट असल्याची देशभरात केवळ हवा करण्यात आलेली आहे. परंतु 10 एप्रिल रोजी विदर्भात झालेल्या 10 लोकसभा मतदारसंघाच्या मतदानानंतर मोदींची हवा कुठे गेली हे गुलदस्त्यातच राहिले. या वेळी विदर्भात कॉँग्रेसला 2009 च्या तुलनेत अधिक जागा मिळतील. सोबतच राष्ट्रवादीच्या दोन जागा विजयी होतील आणि एका ठिकाणी अटीतटीची लढत होईल असे मोहन प्रकाश म्हणाले.

नागपूरमध्ये भाजपने नितीन गडकरी यांना उतरविले. मोदींची देशात आणि गडकरींची नागपूरमध्ये लाट असल्याची हवा पसरविण्यात आली होती. परंतु कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांची स्वच्छ प्रतिमा आणि केलेली विकासकामे यावर ते किमान 50 हजारांच्या फरकाने निवडून येतील. 2009 च्या निवडणुकीत ते 25 हजार फरकाने निवडून आले होते, असेही ते म्हणाले.

मोहन भागवतांचे गाव असल्याने चंद्रपूरची लढत प्रतिष्ठेची
कॉँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांचा प्रतिस्पर्धी दमदार नव्हता. वासनिक यांनी केलेली कामे यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. मेघे परिवाराने वर्धा जिल्ह्यात आरोग्य सेवा आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्याने येथील मतदारांच्या आवडीचा उमेदवार देण्यात आला. मेघेंसाठी भाजपच्याही काही पदाधिकार्‍यांनी पक्ष सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यवतमाळमध्ये महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री अँड. शिवाजीराव मोघे यांची उमेदवारी अगदी शेवटच्या क्षणात जाहीर करण्यात आली असली तरी कॉँग्रेसचे पारंपरिक मते आणि कार्यकर्त्यांची फळी यामुळे मोघे लोकसभेत जातील. येथून शिवसेनेच्या भावना गवळी या तीनदा लोकसभेत गेल्यात. मतदारांची नाराजी आणि पक्षातील अंतर्गत कलहामुळे शिवसेनेला ही जागा गमवावी लागेल.

सरसंघचालक मोहन भागवत हे चंद्रपूरचे असल्याने येथील जागा प्रतिष्ठेची होती. परंतु कॉँग्रेसने राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांना उमेदवारी दिल्याने चंद्रपूरमध्ये संघ-भाजपच्या स्वप्नावर पाणी फेरले जाणार आहे.

गडचिरोलीमध्ये कॉँग्रेसने उमेदवार बदलवून डॉ. नामदेव उसेंडी यांना रिंगणात उतरविले. हजारो आदिवासींनी मतदान केले. येथे 68 टक्क्यांवर मतदान झाले आहे. उसेंडी यांची लोकप्रियता पाहता कॉँग्रेस येथील जागा गमावणार नाही याबाबत मोहन प्रकाश यांना विश्वास वाटतो. अकोला येथे भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे, भारिप-बमसंचे अँड. प्रकाश आंबेडकर आणि कॉँग्रेसचे हिदायत पटेल यांची तिरंगी लढत असली तरी येथील मतदारांना बदल पाहिजे असल्याने या मतदारसंघातील निकाल आश्चर्यकारक लागण्याची शक्यता प्रकाश यांनी व्यक्त केली.

भंडारा आणि अमरावतीत मोदी फॅक्टरचा प्रभाव नाही
भंडारा-गोंदिया येथे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि अमरावतीच्या नवनीत कौर राणा यांच्यावर मोदी फॅक्टरचा कोणताही परिणाम होणार नाही तर बुलडाण्यात अटीतटीचा सामना दिसून येतो. परंतु मतदारांना येथेही बदल आणि विकास हवा आहे. शिवाय कॉँग्रेसच्या पारंपरिक मतांमुळे राष्ट्रवादीचे कृष्णराव इंगळे हे बाजी मारतील, असा विश्वास मोहन प्रकाश यांनी या वेळी व्यक्त केला.