आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Farmers Suicide In Fadanvis Government Period, Ajit Pawar Critised

फडणवीस सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या, अजित पवार यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘आधी पॅकेज, मगच चर्चा’ अशी मागणी लावून गेले दोन दिवस विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत कामकाज न होऊ देणा-या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी बुधवारी या विषयावर चर्चेची तयारी दाखवली. ‘राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने शेतक-यांना भरीव मदत देण्यास अडचणी येणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी ८ ते १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. फडणवीस सरकारच्या एक महिन्याच्या कालावधीत आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्याची टीकाही केली.

मराठवाडा व विदर्भातील दुष्काळावर चर्चा घेण्याची मागणी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून होत होती. सरकारही त्याला तयार होते. मात्र, अगोदर पॅकेज घोषित करा, नंतर चर्चा असा आग्रह विरोधी पक्षाने धरला होता. विरोधकांच्या गोंधळामुळे मंगळवारचे कामकाज तहकूब करावे लागले. बुधवारी सकाळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, तेव्हाच विरोधकांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करून दुष्काळावरील चर्चेची मागणी केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सरकार चर्चेला तयार असल्याचे सांगितल्यानंतर अध्यक्षांनीही चर्चेला परवानगी दिली आणि अखेर दुष्काळावरील चर्चेची कोंडी फुटली.

चैनसुख संचेती यांनी दुष्काळावरील चर्चेची सूचना मांडली. त्यानंतर पतंगराव कदम यांनी मागील सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. नंतर अजित पवार यांनी मात्र सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवत काही सूचनाही केल्या.

‘फडतूस’पणाबद्दल पवारांची दिलगिरी
शिवसेनेला फडतूस खाती मिळाल्याची टीका अजित पवार यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी आक्षेप घेतला. ‘आम्हाला दिलेली खाती तुमच्या सरकारमध्येही होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सरकारमधील या फडतूस खात्याच्या मंत्र्यांची नावे जाहीर करावी,’ अशी मागणी कदम यांनी केली. त्यावर अजित पवार यांनी फडतूस शब्द मागे घेत असल्याचे सांगत दुय्यम खाती मिळाली असा बदल केला. दुष्काळावरील चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री सभागृहात नसल्याबद्दल आक्षेप घेऊन विरोधकांनी कामकाज बंद पाडले. कामकाज सुरू झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक दुष्काळी चर्चेवर गंभीर नसल्यानेच कामकाज बंद पाडत असल्याची टीका केली. ते म्हणाले, मी परिषदेत गेलो होतो आणि येथे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते. आघाडी सरकारच्या काळात आम्ही एका राज्यमंत्र्याच्या उपस्थितीतही कामकाज केल्याची आठवणही विरोधकांना करून दिली.

महिन्यात ४०० आत्महत्या
डिसेंबर महिना संपेल तशी दुष्काळाची तीव्रता वाढत जाऊन एप्रिल-मेमध्ये त्याचा कळस होईल. त्यामुळे आताच गंभीरपणे उपाययोजना सुरू केली पाहिजे. फडणवीस सरकारच्या एक महिन्याच्या काळात ४०० हून अधिक शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या असून आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात इतक्या कमी कालावधीत इतक्या आत्महत्या झाल्या नव्हत्या. हेक्टरी ५० हजार रुपये मदत व कापसाला ६ हजार रुपये भाव देण्याची मागणी करतानाच अजित पवार यांनी पीक कर्ज, वीज बिल माफ, नव्या कर्जासाठी शेतक-याला पात्र ठरवा, अशी मागणी केली.

दिलासा द्या
राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, असे रडगाणे राज्य सरकारने सोडून द्यावे. राज्य सरकार २५ टक्क्यांपर्यंत कर्ज काढू शकते, आम्ही १७ टक्के कर्ज काढले आहे आणखी ८ टक्के कर्ज हे सरकार काढू शकते. त्यामुळे रडगाणे न गाता आणखी कर्ज काढून शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अजित पवारांनी केली.