आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृभाषेसाठी प्रयत्नांची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- ‘मातेने शिकवलेल्या मातृभाषेचे संवर्धन आणि विकासासाठी भाषेचा वापर वाढणे गरजेचे आहे. मातृभाषेविषयीचा कोणताही न्यूनगंड न बाळगता भाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. सर्व भाषा या एकमेकींच्या बहिणी आहेत. त्यामुळे मातृभाषेचा विकास करण्यासाठी इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत सामावून घेतले पाहिजे,’ असे मत जागतिक मातृभाषा दिनानिमित्त शहरातील विविध अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

युनेस्कोने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, अल्पसंख्याक, आदिवासी भागातील काही बोलीभाषा लुप्त होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विविध बोलीभाषांचे संवर्धन होण्यासाठी लोकसाहित्याचे जतन करणे आवश्यक असल्याचे भाषा अभ्यासकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मातृभाषेसाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे भिन्न संस्कृतींमध्ये वावरताना आपल्या मातृभाषेत इतर भाषांतील शब्द व्यवहाराने येतात. असे शब्द भाषेत सामावून मातृभाषा व्यापक बनवली पाहिजे, असे अभ्यासकांनी म्हटले आहे. शहरीकरणामुळे मातृभाषा टिकवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आजचा तरुण सर्वच भाषांची सरमिसळ करून बोलतो. त्यामुळे कुटुंबापासूनच मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. यासाठी कुटुंबांनीच पुढाकार घेत निदान घरात बोलताना मुलांना मातृभाषेचा वापर करण्यास सांगावे. यामुळे मातृभाषा जिवंत राहण्यास मदत होईल आणि येणार्‍या पिढय़ांमध्ये भाषेविषयी आपुलकी निर्माण होईल, अशी आशा शहरातील भाषा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

साहित्याचे जतन व्हावे
भारतीय मातृभाषांच्या संवर्धनासाठी बोलीभाषांची लिपी नाही, अशा भाषांतील लोकसाहित्याचे जतन करण्याच्या दृष्टीने भाषातज्ज्ञ प्रयत्न करीत आहेत. अनेक बोलींचे शब्दकोष तयार होत आहेत. मातृभाषांचा प्रसार होण्यासाठी त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. डॉ. केशव तुपे, मराठी विभागप्रमुख, व्हीएमव्ही

प्रत्येक मातृभाषा श्रेष्ठ
प्रत्येक मातृभाषा श्रेष्ठ आहे. अन्य भाषांतील हजारो शब्द सामावून घेतल्याने इंग्रजी वाढली, तशी आपली मातृभाषा प्रवाही झाली पाहिजे. यासाठी व्यापक कार्य होण्याची गरज आहे. मातृभाषेचे डबके झाल्यास भाषेचा विकास होत नाही. प्रा. अशोक थोरात, ज्येष्ठ कवी.

मातृभाषा दिनाविषयी.
जगातील शिक्षणतज्ज्ञांनी मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. युनेस्कोने याची दखल घेऊन 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा व्हावा, असे आवाहन केले. 1999 पासून हा दिवस साजरा केला जातो.