आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या पथकावर प्राणघातक हल्ला, गाडगेनगर पोलिसांकडून दोघांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मोकाटजनावरे पकडणाऱ्या महापालिकेच्या पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मंगळवारी (दि. २३) चिलम छावणी परिसरात दुपारी चार वाजता ही घटना घडली. आठ ते दहा जणांनी केलेल्या हल्ल्यात मोकाट जनावरे पकडणा-या पथकातील तीन जण जखमी झाले आहेत.
पोलिस सुरक्षा असतानाही प्राणघातक हल्ला झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. तपोवन परिसरातून मोकाट जनावरे पकडून आणत असताना पथकावर नाल्याजवळ दबा धरून बसलेल्या आठ ते दहा सशस्त्रधारी व्यक्तींनी हल्ला चढवला. काठ्या, लोखंडी पाइप, तलवार अन्य शस्त्रांनी काही समजण्याच्या आत पथकावर हल्ला चढवून त्यांनी पथकाच्या ताब्यातील जनावरे सोडून दिली. डॉ. सचिन बोंद्रे, अशोक धनगवणे, अब्दुल रफीक अब्दुल कदीर नियाकत खान हे पथकातील तीन कर्मचारी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झाले. चिलम छावणी परिसरात अचानक हल्ला केल्यानंतर पालिकेच्या पशुशल्य चिकित्सक विभागातील तीन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना काठ्या, पाइप, सळाखीने मारहाण करण्यात आली. शिवाय जीवे मारण्याची धमकीदेखील देण्यात आली. पथकाकडून पकडण्यात आलेली दोन जनावरे हल्ल्यादरम्यान हल्लेखोरांकडून सोडून देण्यात आली. पथकामध्ये असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांकडून हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हल्लेखोरांकडे असलेल्या शस्त्रांमुळे कर्मचाऱ्यांचे काहीच चालले नाही. याबाबत गाडगेनगर पोलिस ठाण्यात पालिकेच्या वतीने दिलेल्या तक्रारीवरून पोिलसांनी चिलम छावणी येथील आसिफ बब्बू अमीर बब्बू या दोन हल्लेखोरांना अटक केली. हल्लेखोरांपैकी जफर रणजित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोरांपैकी अटक केलेले दोघांवर गणेशोत्सवादरम्यान प्रतिबंधित कारवाई केली होती. या दोघांची पोलिस कोठडी मागितली जाणार असून, अन्य हल्लेखोरांबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन जनावरांमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पोिलस सुरक्षेमध्ये मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई पालिकेकडून सुरू करण्यात आली. जनावरांच्या बंदोबस्तासाठी पालिकेला ट्रंक्युलायझर गनदेखील प्राप्त झाली आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने अनेक पशुपालकांनी याचा धसका घेतला.