आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municpal Commisonor Chandrakant Gudewar Meeting Amravati

आमसभेतून स्पष्ट होणार आयुक्तांपुढील आव्हाने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नवे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या उपस्थितीत होणारी मनपाची पहिली आमसभा सोमवारी (दि. २०) होत आहे. या सभेतूनच अमरावतीच्या पुढ्यात असलेल्या आव्हानांची स्पष्टता होणार असून, आयुक्तांनी आपल्या कामकाजाची प्राथमिकता निश्चित करावी, याचे संकेतही याच दिवशी मिळणार आहेत.

विविध शक्यतांच्या पार्श्वभूमीवर या महिन्याची आमसभा सोमवारी होत आहे. आयुक्त नवे असल्याने बहुतेक पदाधिकार्‍यांनी शहर विकासाशी संबंधित मुद्दे प्रस्ताव प्रश्नांच्या माध्यमातून कार्यक्रमपत्रिकेत उपस्थित केले आहेत. या सर्वांना त्या-त्या मुद्द्यांबाबत जाब हवा आहे. त्यामुळे ही आमसभा म्हणजे आयुक्त गुडेवार यांच्यासाठी एक कसोटीच ठरणार आहे. नव्या आयुक्तांपुढे प्रशासनाची कोंडी व्हावी, असे अनेक मुद्देही आमसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत.

सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्तीच्या नावावर लीज वाढवून देण्यासाठी चाललेला सर्वपक्षीय खटाटोप, वडाळी छत्री तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी खासगी कंपन्यांना दिले गेलेले कंत्राट, रस्ते इतर बांधकामांमधील अनियमितता, विस्कळीत वाहतूक, दिवसागणिक वाढणारे अतिक्रमण, अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये स्थिरावलेला निष्काळजीपणा, बीओटी तत्त्वावरील कामांच्या करारनाम्यांचे उल्लंघन, वीज बील कमी करण्यासाठी केला जाणारा एलईडी लाइटचा प्रयोग, उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या एलबीटी मालमत्ता कराच्या वसुलीत आलेली घट, असे अनेक मुद्दे समोर येणार असल्याने ही आमसभा वादळी ठरण्यासोबतच दूरगामी संदेश देणारीही ठरेल, अशा अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत.

काँग्रेसची तुरळक उपस्थिती !
आगामी रविवारी (दि. १९) दल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत देशव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला उपस्थित राहण्यासाठी शहरातील अनेक पदाधिकारी जात आहेत. यामध्ये काही नगरसेवकांचाही समावेश आहे. अर्थात जे नगरसेवक १९ ला दिल्लीत असतील, ते दुसर्‍या दिवशी आमसभेला उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळेच आमसभेत काँग्रेसजणांची तुरळक उपस्थिती असेल, अशी माहिती आहे.

तारीख मीच ठरवलीय
महापालिकेच्या आमसभेची २० एप्रिल ही तारीख मीच ठरवली आहे. आमच्या पक्षाचा (काँग्रेसचा) दिल्लीमध्ये मेळावा आहे. त्यासाठी कोण-कोण जात आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. स्वत: मीही जाण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही. तसे झाले, तरीही आमसभा स्थगित होण्याचे काही कारण नाही. चरणजितकौर नंदा, महापौर, अमरावती.