नागपूर - मुझफ्फरनगरमधील मदत शिबिरांमध्ये लहान मुलांच्या झालेल्या मृत्यूला राज्य सरकार जबाबदार नसून तेथील अधिकारी असल्याचे सांगत मुख्य सचिवांना त्वरित बडतर्फ करावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली.
मुझफ्फरनगर येथील मदत शिबिरांमध्ये थंडीमुळे जवळपास 50 मुलांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मदत शिबिरात योग्य सुविधा न पुरवल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
नागपूर येथे या विषयावर बोलताना अबू आझमी म्हणाले, यात राज्य सरकारचा काहीही दोष नाही. राज्य सरकार सर्व सुविधा आणि पैसे पुरवत आहे, परंतु काही अधिकार्यांमुळे तेथील शिबिरातील नागरिकांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. मी गेल्या वेळी गेलो तेव्हाही तेथे योग्य सुविधा नव्हत्या. त्याबाबत आवाज उठवल्यानंतर काही सुविधा पुरवण्यात आल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. आझमी म्हणाले, मी 22 डिसेंबरला मुझफ्फरनगरला जात असून तेथील शिबिरात माझ्याकडून आर्थिक मदत देण्याबरोबरच सर्व प्रकारच्या सुविधाही पुरवणार आहे.