आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N. D. Mahanor Doesnt Want To Be Sahitya Sammelan President

बिनविरोध निवडले तरी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणार नाहीः ना. धो. महानोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ह्या शेताने लळा लाविला असा असा की,
सुखदुखाला परस्परांशी हसलो रडलो.
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो.

असे शेतीशिवारात आणि रानात प्राण गुंतलेला कवी म्हणजे ना. धों. महानोर. शनिवारी डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ते नागपुरात आले असता त्यांच्याशी दिलखुलास गप्पा झाल्या. त्यात त्यांनी साहित्य संमेलनापासून बदलत्या सामाजिक संदर्भांचा वेध घेतला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा विषय निघाला असता त्यांनी, आता बिनविरोध निवडले तरी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणार नाही, असे नितळ स्वच्छपणे सांगून टाकले.

1980 मध्ये मी महामंडळाचा अध्यक्ष असताना घटनेत दुरुस्ती व्हावी आणि संमेलनाचा अध्यक्ष बिनविरोध व्हावा या मागणीसाठी राजीनामा दिला होता. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष्य बिनविरोध निवडून आला पाहिजे, या माझ्या भूमिकेवर आजही मी कायम आहे. राहिला प्रश्न घटना दुरुस्तीचा तर विविध संस्था, संघटनांच्या घटनेत काळानुरूप कालसुसंगत असे बदल झाले आणि होतात. खुद्द अ. भा. मराठी साहित्य महामंडळानेही विश्व साहित्य संमेलन घेण्यासाठी घटनेत बदल केला. मग साहित्य संमेलनाची निवडणूक बिविरोध व्हावी यासाठी घटनेत बदल केला तर काय बिघडले असा सवाल महानोर यांनी केला.

मतांसाठी याचना करणे मान्य नाही
निवडणुकीसाठी फॉर्म भरून देणे म्हणजे मतांसाठी याचना करणे आलेच. मला अशी याचना करणे मान्य नाही. साहित्य संमेलनाच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने होत नाहीत. निवडणुकीत मतदान करणारे मतदार किमान साहित्यिक वा साहित्याशी संबंध असणारे निदान उत्तम लेखक तरी असणे अपेक्षित आहे. पण असे होत नाही. पानटपरीवाले, चहाठेलेवाले मतदार असतात. मग निवडून येण्यासाठी गठ्ठा मते पळवली जातात. साहित्याशी काडीचाही संबंध नसणारे मतदार असतील तर काय होईल, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. विंदांना पराभवाची भीती होती का. संमेलनाध्यक्षाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली की, मागणी करणार्‍याला पराभवाची भीती वाटते. असा आरोप हमखास केला जातो. त्यात काही तथ्य नाही. विंदा करंदीकर संमेलनाध्यक्ष्यपदाची निवडणूक कधीही लढले नाही.केवळ संमेलने व निवडणुका नको

केवळ संमेलने व निवडणुका घेणे हेच महामंडळाचे काम नाही. विदर्भ, मराठवाडा, पुणे व मुंबई या महामंडळाच्या चार घटक संस्था आहे. तेथे साहित्य, कला, संस्कृती, भाषा तसेच शेती व समाजाच्या प्रश्नांवर मंथन घडवून आणावे, या अनुषंगाने अनेक उपक्रम राबवता येईल. पण हे करण्याचे सोडून महामंडळ केवळ संमेलने व निवडणुका घेते अशी टीका महानोर यांनी केली. सर्वसमावेशक प्रश्नांना घेऊन संमेलने होत नाहीत तोपर्यंत मला त्यात रस नाही, असे महानोरांनी स्पष्टपणे सांगितले.


पुरस्कार उमेदीतच दिले जावे
भारतरत्न असो की फाळके पुरस्कार. बहुतांश पुरस्कार व्हीलचेअरवर दिले जातात असे अलीकडचे दृश्य आहे. हे मनाला पटत नाही. उतारवयात सारी उमेद संपल्यानंतर दिलेला पुरस्कार स्वीकारण्यात कुणालाच रस नसतो. म्हणून त्यात बदल करण्यात यावा आणि पुरस्कार उमेदीच्या काळातच देण्यात यावे, असेही महानोर यांनी या वेळी बोलताना सांगितले.


खर्च कमी करता येतो ना
संमेलनावर एक कोटी खर्च करण्यापेक्षा ते साध्या, स्वच्छ व नितळ पद्धतीनेही करता येईल. छान भाजी भाकरी व राहण्याची व्यवस्था केली तरी लोक येतात. आजकाल ओला दुष्काळ असो की कोरडा दुष्काळ असो, संमेलन कोणी रद्द करीत नाही. मागे नाही का राज्यात दुष्काळ असतानाही संमेलनावर कोट्यवधीचा खर्च झाला.