आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpur Central Jail Superintendent Vaibhav Kambale Missing

अनागोंदी : निलंबित अधीक्षक वैभव कांबळे बेपत्ता, पत्नीने दिली माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - स्वत:च्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील आदर्श कारागृहाला कैद्यांचे नंदनवन बनवून ठेवणारा निलंबित तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे हा कारवाईच्या भीतीने बेपत्ता झाला आहे. त्याची पत्नी सुनीता कांबळे यांनी शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास कारागृह प्रशासनाला ही माहिती दिली. या माहितीनंतर कारागृह परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून अटकेच्या भीतीमुळे अधीक्षक कांबळे फरार झाल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
नागपूर कारगृहातील अनागोंदी कारभाराचा "दिव्य मराठी' सातत्याने पाठपुरावा करत आहे. ३१ मार्च रोजी मध्यरात्री पाच कैदी नागपूर कारागृहातून पळून गेले. या प्रकरणाची अतिरिक्त पोलिस महासंचालक (तुरुंग) मीरा बोरवणकर चौकशी करत आहेत, तर कारागृहातील कैद्यांना विशेष सेवा पुरविणे, कैद्यांना अर्जित आणि संचीत रजा मंजूर करणे, कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्यासाठी लाच मागणे, अधिकारांचा गैरवापर करून कैद्यांची शिक्षा कमी करणे आदी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित करत आहेत. या दोन्ही चौकशी समितींच्या कामांमुळे वैभव कांबळे चांगलाच अडचणीत आला आहे.

एसीबीच्या चौकशीत कांबळे याच्यावर शनिवारी कारवाई होण्याची शक्यता होती. त्यामुळे तो पहाटेच पत्नीला काहीही न सांगता घराबाहेर पडला. दुपारी जेवणाच्या सुमारास पत्नीने त्यांना मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे पत्नीने दुपारी ४.३० च्या सुमारास तुरुंगातील प्रवेशद्वाराच्या क्रमांकावर दूरध्वनी करून वैभव कांबळे सकाळपासून बेपत्ता असून ते कारागृहात आहेत का, अशी विचारणा केली. तुरुंगाच्या शिपायाने कांबळे तुरुंगात नसल्याची माहिती पत्नी सुनीताला दिली, अशी माहिती कारागृहाच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

कांबळेचा पाठीराखा कोण? कारापूर कारागृहात रुजू झाल्यापासून अधीक्षक कांबळे याच्याविरुद्ध पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारी प्राप्त होताच उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांनी त्या तक्रारी अतिरिक्त पोलिस महासंचालक (तुरुंग) कार्यालयाकडे वर्ग केल्या.
गेल्या दोन वर्षांत तुरुंग महासंचालक कार्यालयाकडे ५३ तक्रारींचा गठ्ठा जमा झाला. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून कांबळेंच्या तक्रारींची दखल का घेण्यात आली नाही? त्याला राजकीय अथवा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संरक्षण होते का? याचा तपास करून प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दीक्षित यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
दीक्षित यांनी मागवले दस्तावेज

वैभव कांबळे नागपूर मध्यवर्ती कारागृहात रुजू झाल्यापासून झालेल्या व्यवहारांचे दस्तावेज सादर करण्याचे निर्देश प्रवीण दीक्षित यांनी कारागृहातील अधिकाऱ्यांना दिले. शनिवारी दीक्षित यांनी कारागृहातील बराकी आणि घटनास्थळांची पाहणी केली. दीक्षित यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला असून कारागृहातील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी मी इथे असल्याचे सांगितले.
पाच शिपाई निलंबित

४ एप्रिल रोजी ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेल्या ‘जेलमध्ये पोलिसांच्या ऑन ड्यूटी झोपा’ या वृत्तात सहा शिपायांच्या निलंबनाचे पत्र तयार असल्याचे सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले असून मीरा बोणवरकर यांच्या आदेशानंतर शनिवारी पोलिस उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांनी मंगेश पन्नालाल प्रजापती, राजू रामभाऊ पाटील, संजय मधुकर ठोकळ, रमेश काशीनाथ ढेकले आणि अशोक नत्थुजी भांडारकर यांना निलंबित केले, तर सहावा शिपाई म्हणून एका होमगार्डवर कारवाई केली.
कारागृहात सापडले २८ मोबाइल
नागपूर मध्यवर्ती कारागृहात २८ मोबाइल सापडल्याचे शनिवारी उघडकीस आले. अतिरिक्त पोलिस महासंचालक (तुरुंग) मीरा बोरवणकर या कारागृहातील ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करीत असताना एवढ्या मोठ्या संख्येने मोबाइल सापडल्याने तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली.

या घटनेनंतर ‘दिव्य मराठी’ने ३ एप्रिल रोजीच्या अंकामध्ये ‘कैद्यांच्याच सोयीचा अधीक्षकाचा कारभार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामध्ये कैद्यांकडे मोबाइल असल्याचे सविस्तर वृत्त होते.