आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpur Congress Nagpur City President Post Politics

नागपूर : काँग्रेस शहराध्यक्ष गुप्ता यांना हटवण्याच्या हालचालींना वेग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - मागील पाच वर्षांपासून शहर काँग्रेसचे अध्यक्ष असलेले जयप्रकाश गुप्ता यांना हटवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गुप्ता यांची भूमिका कायम मिळमिळीत राहिली असून, ते विरोधकांना आक्रमकपणे उत्तर देत नसल्याने शहर काँग्रेसचे अस्तित्व जाणवत नाही, असा आक्षेप घेत गुप्ता यांना हटवण्याचा निर्णय महिनाभरापूर्वी घेण्यात आल्याची माहिती शहर काँग्रेसच्या एका पदाधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. गुप्ता यांच्याऐवजी महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांना शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यासाठी फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे.

दोन गटांचे भांडण, गुप्तांना लाभ
‘दोघांचे भांडण तिसर्‍याला लाभ’ या म्हणीप्रमाणे खासदार विलास मुत्तेमवार व मंत्री नितीन राऊत यांच्या गटांतील भांडणाचा लाभ जयप्रकाश गुप्ता यांना मिळत आहे. गुप्ता यांचा तीन वर्षांचा अध्यक्ष काळ केव्हाच संपला आहे. परंतु, शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या नावावर दोनपैकी एकाही गटाचे एकमत होत नसल्याने गुप्ताच अध्यक्षपदी कायम आहेत. आता त्यांना फटाके लावण्यात येत आहे. शहराध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असलेले विकास ठाकरे हे आक्रमक स्वभावाचे आहे. जशास तसे ही कार्यशैली आणि रोखठोक स्वभावामुळे ते लोकप्रिय आहे. जयप्रकाश गुप्तांनी आजपर्यंत जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यापलीकडे काहीही केले नाही. भाजपने सोनिया गांधींचा पुतळा जाळला. त्याला सडेतोड उत्तर देणे, तर सोडाच त्यावर साधी प्रतिक्रिया देणेही गुप्तांनी टाळले. तेव्हापासून त्यांच्याविरोधात असंतोष खदखदत आहे.