आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर पदवीधरचा बालेकिल्ला भाजपने राखला, सोले विजयी; काँग्रेसचे तायवाडे 31 हजार मतांनी पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाचा गड कायम राखत भाजपचे प्रा. अनिल सोले यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. बबनराव तायवाडे यांचा पहिल्या पसंतीच्या मतांच्या फेरीतच 31 हजार 259 मतांनी पराभव केला. यापूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सलग पाचवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

एकूण वैध 94 हजार 84 मतांपैकी भाजपचे अनिल सोले यांना पहिल्या पसंतीची 52 हजार 485 मते मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे डॉ. तायवाडे यांना 21 हजार 226, तर फुले-शाहू-आंबेडकर पदवीधर संघटनेचे उमेदवार व माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये 19 हजार 455 मते घेऊन तिसर्‍या स्थानावर राहिले. पहिल्या फेरीतील विजयासाठी 47 हजार 43 मतांचा कोटा ठरला होता. सोले यांनी मतमोजणीच्या पाचव्या फेरीतच तो पूर्ण केला. अगदी पहिल्या फेरीपासूनच सोले यांनी तायवाडे यांच्यावर मोठी आघाडी घेतली होती.

219 मते ‘नोटा’
पहिल्यांदाच या निवडणुकीत ‘नोटा’ पर्याय वापरला गेला व 219 मतदारांनी हा पर्याय निवडला, तर तब्बल 5 हजार 973 पदवीधरांची मते अवैध ठरली. या निवडणुकीत जेमतेम 34.7 टक्के मतदान झाले होते. एकूण 2 लाख 88 हजार 326 मतदारांपैकी 1 लाख 273 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपने महायुतीच्या माध्यमातून तर काँग्रेसने आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली होती. दरम्यान, या विजयानंतर भाजपने नागपुरात जल्लोष केला. मतमोजणी केंद्राजवळून विजयी मिरवणूक काढली.

वरचष्मा कायम
या विजयासह भाजपने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला कायम राखला. निर्मितीपासूनच हा मतदारसंघ सातत्याने भाजपच्या ताब्यात आहे. यापूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सलग पाचवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गडकरींपूर्वी दिवंगत नेते गंगाधरराव फडणवीस, रामजीवन चौधरी, पंडित बच्छराज व्यास या तत्कालीन जनसंघाच्या नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
गडकरींच्या नेतृत्वाचा विजय-सोले
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाचा विजय असून, पदवीधर मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, अशी प्रतिक्रिया प्रा. अनिल सोले यांनी विजयावर बोलताना व्यक्त केली. प्रा. सोले म्हणाले की, हा मतदारसंघ गडकरींसारख्या नेत्याने घडवला आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपवर जो विश्वास दाखवला तोच पदवीधरांनी या निवडणुकीत दाखवला. त्यामुळे या नागपूर विभागात विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान करण्याचे प्रयत्न राहतील, असे ते म्हणाले.

छायाचित्र : नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार प्रा. अनिल सोले यांची मंगळवारी विजयी मिरवणूक काढण्यात आली.