आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळालेले कुख्यात कैदी पुन्हा जेरबंद, चप्पलमधून कारागृहात नेली होती आरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या पाच कुख्यात कैद्यांपैकी दोघांना अटक करण्यात नागपूर पोलिसांना गुरुवारी यश आले. या कैद्यांना पळून जाण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन देशी कट्टे, एक रिव्हॉल्व्हर आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली अाहेत. दरम्यान, उर्वरित तीन कैद्यांच्या शाेधासाठीही युद्धपातळीवर प्रयत्न केले जात अाहेत.

३१ मार्चच्या मध्यरात्री नागपूर कारागृहातील सहा क्रमांकाच्या बराकीच्या खिडकीचे गज कापून पाच कुख्यात कैदी पळून गेले हाेते. सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता, मोहंमद सोहेब खान ऊर्फ शिब्बू सलीम खान, बिसेनसिंग रम्मूलाल उईक, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री आणि आकाश ऊर्फ गोलू रज्जूसिंग ठाकूर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यापैकी मोहंमद साेहेब आणि प्रेम ऊर्फ नेपाली यांना गुरुवारी दुपारी नागपूर जिल्ह्यातील कोराडी तालुक्यातील बोकारा रेल्वे गेटजवळ पकडण्यात आले. त्यांच्यासोबत असणारा अरमान ऊर्फ मुन्ना मलिक (२२ रा. उरई, उत्तर प्रदेश) यालाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून माेठा शस्त्रसाठाही सापडला. हे आरोपी एका धनाढ्य व्यक्तीला लुटण्याच्या हिशेबाने आले होते.

वादग्रस्त देसाईंकडे कारागृह अधीक्षकपद
पुण्याच्या येरवडा कारागृहाचे वादग्रस्त अधीक्षक योगेश देसाई यांनी गुरुवारी नागपूरच्या कारागृहाचे अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पाच कैदी पळून गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित केले. त्यांच्या जागी देसाई यांची बदली करण्यात अाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई हे आतापर्यंत तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये निलंबित झाले आहेत. कल्याण जिल्हा कारागृहात असताना १२ हजार रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात अाली हाेती. नाशिकच्या कारागृहात एका कैद्याच्या खून प्रकरणात २००२ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते, तर पुणे येथील तुरुंग रक्षक भरती प्रकरणातही त्यांच्यावर कारवाई झाली होती. अनेक प्रकरणांत अडकलेले आणि वादग्रस्त अधिकारी नागपूर कारागृहाच्या माथी मारण्यात आले आहेत.

कारागृहातून पळून जाण्यापूर्वी हे आरोपी चप्पलमधून कारागृहाच्या आत आरी घेऊन गेले होते. पळून जाण्याच्या सात दिवसांपूर्वीपासून ते कारागृहाच्या खिडकीचे गज कापत होते. गज कापल्यानंतर ३१ मार्चच्या मध्यरात्री पांघरुणासाठी असलेल्या सात ते आठ चादरींसह ते बराकीतून बाहेर पडले. पहिली १० फुटांची उंच भिंत ओलांडल्यानंतर मुख्य २३ फुटांची सुरक्षा भिंत ओलांडण्यासाठी त्यांनी सोबत घेतलेल्या चादरी एकमेकांना बांधल्या. त्यानंतर पाचही जण एकमेकांच्या खांद्यावर उभे होऊन प्रथम एक कैदी भिंतीवर चढला. कैद्यांची वाट बघत कारागृहाबाहेर एक जण होता. त्याने चादरी बांधून तयार केलेली दोरी बाहेरच्या एका रॉडला बांधली आणि तिच्या साहाय्याने सर्व जण कारागृहाबाहेर पडले.

बैतुल येथे पोलिसावर गोळीबार
महाराष्ट्राबाहेर पडल्यानंतर मध्य प्रदेशातील बैतुल येथे पोलिसांची नाकेबंदी सुरू असताना पाचही कैद्यांनी एका पोलिस शिपायावर गोळीबार केला. त्यासंदर्भात मध्य प्रदेश पोलिसांत गुन्हा दाखल आहे. गेल्या दीड महिन्यापासून ते सतत मुक्कामाचे स्थान बदलत होते.

छिंदवाडा मार्गाने पळाले होते
कारागृहाबाहेरूनमदत करणाऱ्याने दुचाकीने प्रथम तीन कैद्यांना मानकापूर बसस्थानकावर पोहोचवले. त्यानंतर दोघांना घेण्यासाठी परत आला. मानकापूर स्थानकावरून रात्रीच छिंदवाडा बसने ते महाराष्ट्राबाहेर निघून गेले.

काेट्यवधी रुपयांच्या लुटीचे दाखवले अामिष
पळूनगेलेले आरोपी दररोज आपले मुक्कामाचे स्थान बदलून तपास पथकांना गुंगारा देत होते. त्यामुळे पोलिसांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये घेऊन जात असल्याची टीप आरोपींपर्यंत पोहोचवली. हे पैसे लुटण्यासाठी आरोपी नागपूरजवळ आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. उर्वरित तीन जणांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त एस. पी. यादव यांनी पत्रपरिषदेत दिली.