आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpur Muncipal Corporation Election Report Congress Ncp Bjp Shivsena Mns Janshakti

नागपूर महापालिका : आघाडी - महायुतीत तुझे माझे जमेना...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात १० महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत रंग भरायला सुरुवात झाली आहे. नागपूरातील वातावरणही हिवाळ्यात तापू लागले आहे. इथे 'हाता'वर 'घड्याळ' अजूनही फिट्ट बसत नाही तर 'कमळा'ला 'धनुष्यबाणा'चे संरक्षण वाटण्याऐवजी नाराजीचे बाण बोचत असल्याचीच परिस्थिती आहे. उपराजधानीमध्‍ये आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचे गु-हाळ अद्याप सुरुच आहे. आघाडी आणि युती तर हवी. परंतु, कोणत्‍याही पक्षाचे सहका-यासोबत पटत नसल्‍याचेच चित्र आहे.

काँग्रेस - राष्ट्रवादीचे संबंध हे तुझे माझे जमेना अन् तुझ्या वाचून करमेना असेच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० जागांची मागणी करण्यात आली. ही मागणी आवास्तव असल्याचे सांगून काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांनी फेटाळून लावली आहे. त्यातही, राष्ट्रवादीने बहुतेक पुरुष वार्डांवर बोट ठेवल्याने काँग्रेसने राष्ट्रवादीला नव्याने यादी तयार करण्यास सांगितले. राष्ट्रवादीने तयार केलेल्या यादीमुळे काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेसने ५० टक्के पुरुष आणि ५० टक्के महिला अशा प्रभागांची यादी सादर करण्यास राष्ट्रवादीला सांगितले आहे.
भाजपच्या ताब्यात असलेल्या पालिकेवर पून्हा काँग्रेसचा झेंडा फडकवायचा असेल तर समविचारी मतांची विभागणी टाळली पाहिजे असा सूर दोन्ही काँग्रेसचा आहे. सोमवार संध्याकाळपर्यंत आघाडीचे जागावाटप पूर्ण होईल अशी चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचा आग्रह जरी ४० जागांचा असला तरी ३० जागांवर तडजोड होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसमध्‍ये गटबाजीची धुसफूस सुरुच
रविवारी झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे झाडून सारे नेते आणि कार्यकर्ते या मेळाव्याला हजर राहिले होते. राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली तर चांगलेच अन्यथा लहान-मोठ्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूकीला सामोरे जाण्याची काँग्रेसची तयारी आहे. काँग्रेसने त्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत.
वरकरणी सर्वकाही आलबेल दिसत असलेल्या काँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण मात्र वेगाने सुरु आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी पूर्व नागपूरमध्ये स्वतंत्र मुलाखती घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे मागील मनपा निवडणूकीची पुनरावृत्ती होते की काय याची भीती काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांबरोबरच इच्छुक उमेदवारांना लागून राहिली आहे.
गेल्या वेळी सतीश चतुर्वेदी आणि खासदार विलास मुत्तेमवार यांच्या वादाचा फायदा भाजपने घेतला होता. या वादामुळे काँग्रेसच्या हातातून मनपा सोबतच जिल्हा परिषद देखील गेली होती.

भाजपची मुलाखतीत 'आघाडी'
काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागा वाटप आणि अंतर्गत कलहात वेळ खर्च होत असतांनाच भारतीय जनता पक्षाने इच्छुकांच्या मुलाखतींना सर्वप्रथम प्रारंभ करुन एकप्रकारे निवडणूकीत 'आघाडी' घेतली असल्याची चर्चा आहे.
नागपूर महापालिकेत भारतीय जनता पक्ष - शिवसेना - रिपब्लिकन पक्ष यांची महायुती असली तरी भाजपने जागा वाटपाचे भिजत घोंगडे तसेच ठेवून मुलाखतींना प्रारंभ केला. शिवसेनेने महायुतीत ५० जागांची मागणी केली आहे तर, भाजपने त्यांना १४-१५ आणि रिपाईला ८-१० जागा देण्याच्या तयारी दर्शविली आहे.
दरम्यान भाजपच्या १५०० अर्जांची विक्री झाली असून हजाराहून अधिक इच्छूकांनी पक्षाकडे अर्ज भरून दिले आहेत. भाजपकडून या निवडणूकीची शिस्तबध्द आखणी केलेली दिसून येत आहे. २ जानेवारीपासून त्यांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय मुलाखती सुरु झाल्या आहेत. यासोबतच प्रभागनिहाय सभा देखील घेण्यात आल्या. या सभांमध्ये भाजपने नागरिकांची मते जाणून घेतली आहेत. त्यांच्या समस्या आणि आपेक्षांचीही नोंद या सभांमधून करुन घेण्यात आली. निवडणूकीतील इच्छुकांशी वैयक्तिक चर्चा केली गेली. अशा पध्दतीने अतिशय योजनाबद्धरित्या भाजपने निवडणूकीची आखणी केली आहे.
दुसरीकडे, भाजपला गुन्हेगारांच्या मुलाखती आणि 24/7 च्या जाहिरातीमुळे विरोधकांच्या टिकेला सामोरे जावे लागत आहे. कुख्यात अनिल धावडे आणि गणेश श्रीपात्रे यांच्या मुलाखती घेतल्यामुळे भाजप नेतृत्वाला पक्षांतर्गतच विरोध होत आहे. अनिल धावडे याची कुख्यात गुंड आणि सट्टाकिंग म्हणून नागपूरमध्ये ओळख आहे. तर गणेश श्रीपात्रे याच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह मोहन अग्निहोत्री यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. या दोघांना मुलाखतीला बोलावून भाजपने स्वकीयांचाच रोष ओढवून घेतला आहे. दुसरीकडे ४ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या 24/7 च्या जाहिरातीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कमलनाथ यांच्या छायाचित्रांचा वापर केल्यामुळे काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपच्या या जाहिरातीवर काँग्रेसने आक्षेप घेत पोलिसात भाजप विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच भाजप नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
आता शिवसेनाही भाजपला सोडून स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख विनायक राऊत यांनी रविवारी शिवसेनेला सन्मानजनक वागणूक आणि किमान २५ जागा दिल्या तरच युती होईल अन्‍यथा शिवसैनिकांनी स्वतंत्ररित्या निवडणूकीला सामोरे जावे असे स्‍पष्‍ट केले. परंतु, भाजप शिवसेनेला केवळ १४ जागा देण्यास राजी आहे. त्‍यामुळे उपराजधानीमध्‍ये युतीतील धुसफूस उघड झाली आहे. आता हे चर्चेचे गु-हाळ आणखी किती दिवस चालते हे सांगणे आवघड झाले आहे.
चर्चेच्या गु-हाळामुळे आघाडी आणि महायुतीच्या इच्छुकांची मात्र पंचाईत झाली आहे. निवडणूक जवळ येत असतांना अजूनही कोणताच निर्णय होत नसल्यामुळे प्रचाराला अत्यंत कमी दिवस मिळणार आहेत.

'जनशक्ती' आघाडी आणि महायुतीला टक्कर देण्यास सज्ज
आघाडी आणि महायुतीला टक्कर देण्यासाठी जनशक्ती आघाडी सज्ज झाली आहे. भारिप बहुजन महासंघ, आदिम संविधान संरक्षण समिती, स्वाभिमानी शिवसेना, शेतकरी संघटना आणि काही डाव्या संघटना यांचा या आघाडीत समावेश आहे. या आघाडीचे निमंत्रक नितीन चौधरी असून जनशक्ती आघाडी सर्व जागा लढविणार आहे.
ही आघाडी काँग्रेस - राष्ट्रवादी बरोबरच भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. या आघाडीत माजी आमदार मोहन मतेंसह मिलिंद पखाले, नंदा पराते आणि शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख दिवाकर पाटणे यांचा समावेश आहे. मागील निवडणूकीत नंदा पराते, मिलिंद पखाले यांनी प्रत्येकी २-३ नगरसेवक निवडून आणले होते. यंदा त्यांना जनशक्ती आघाडीची साथ असल्याने ते आघाडी आणि महायुतीला धोकादायक ठरु शकतात. जनशक्ती आघाडी किती जागांवर निवडून येते हे आत्ताच सांगणे अवघड असले तरी त्यांचे उपद्रवमुल्य वाढले आहे एवढे मात्र निश्चत.

शहर प्रमुखांची मनसेला सोडचिठ्ठी
मनसेचे शहर प्रमुख मामा धोटे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मनसेच्या शहरप्रमुख पदासोबतच ते नगरसेवक देखील आहेत. यामुळे मनसेला हक्काच्या एका जागेला मुकावे लागणार आहे. मामा धोटे यांनी मनसेच्या परीक्षा पद्धतीला विरोध केला होता. मी विद्यमान नगरसेवक असून मला पक्षाने सरळ तिकीट द्यावे अशी त्‍यांनी मागणी केली होती. मात्र हे पक्षशिस्ती विरोधात असल्याचे त्‍यांना सांगण्‍यात आले आहे. नुकतेच राज ठाकरे यांच्या नागपूर दौ-यावेळी त्यांची अनुपस्थिती होती. यामुळे ते पक्षावर नाराज असल्याचे स्पष्ट झाले होते. आता ते कोणत्या पक्षात जातात याबद्दल उत्सूकता आहे.

जाता जाता
निवडणूकीत निवडूण येण्यासाठी कोण काय करेल हे काहीच सांगता येत नाही. मात्र निवडणूकीची पहिली प्रक्रिया म्हणजे तिकट मिळविण्याची लढाई. महापालिकेच्या या निवडणूकीत पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी काही इच्छुकांनी टेकडी गणपतीच्या दान पेटीत अर्ज टाकून देवाकडे उमेदवारीचे दान मागितले आहे. इच्छुकांनी पक्ष कार्यालयात अर्जाची सत्यप्रत जमा करुन त्याची झेरॉक्स दान पेटीत टाकल्याचे आढळून आले आहे. यामुळे उमेदवारीसाठी कोणताही उपाय कमी पडू नये असाच इच्छुकांचा होरा असल्याचे दिसता आहे.
unmesh.khandale@dainikbhaskar.com
नागपूर महापालिका : सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांत रस्सीखेच