नागपूर - नागपूर महापालिकेशी संबंधित सर्व सेवा आता मोबाइल अॅपवर उपलब्ध होणार आहे. यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिका स्वत:चे अॅप्लिकेशन तयार करणार असून हे डाऊनलोड करून महापालिकेशी संबंधित सर्व सेवांचा मोबाइलद्वारे वापर करता येईल.
अर्थसंकल्प सादर करताना अविनाश ठाकरे यांनी महापालिका ऑन मोबाइल संकल्पना मांडली होती. ती आता प्रत्यक्षात येणार असून, 30 डिसेंबरला आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत यावर मंजुरीची मोहोर उमटेल. त्यानंतर दोन महिन्यांत सेवा सुरू होईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. मोबाइल अॅप्सद्वारे तक्रार प्राप्त झाल्यानंतर 48 तासांत कारवाई करण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले.
अँड्रॉइड असलेल्या कोणत्याही मोबाइलधारकाला फेसबुक, ट्विटरप्रमाणे हे अॅप्लिकेशन नि:शुल्क डाऊनलोड करता येईल. यावर क्लिक केल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांची यादी येईल. आपल्याला काम असलेल्या विभागावर क्लिक केले की, संबंधित विभागाच्या सेवा उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे.
असे होईल काम
एखाद्या भागातील कचरा वा रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो काढून मोबाइलमधील अॅप्सचा वापर करून तो संबंधित विभागाकडे पाठवा. नागरिकाने पाठवलेला मेसेज वा फोटो संबंधित विभागाच्या कनिष्ठ अधिका-यापासून उपायुक्तांपर्यंत जाईल. आयुक्त तसेच संबंधित विभागाच्या नगरसेवकालाही हा मेसेज जाईल. ही सेवा सॅटेलाइट जीपीएस प्रणालीशी जोडलेली असल्यामुळे खड्डा किंवा कचरा नेमका कुठे पडलेला आहे, याचे लोकेशन लगेच कळेल.