आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpur News In Marathi, Lok Sabha Election, Gadchiroli, Moist, Divya Marathi

गडचिरोलीत बुलेट विरुद्ध बॅलेटचाच सामना, मतदार करणार लोकशाहीचा उत्सव साजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - लोकसभेच्या निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. राजकीय पक्ष, पुढारी आणि कार्यकर्ते मतदारांना आश्वासने देऊन अधिकाधिक मते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील नक्षलग्रस्त गडचिरोली- चिमूर मतदारसंघात मात्र वेगळेच वातावरण आहे. नुकत्याच छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या भागाला सध्या छावणीचे स्वरूप आले आहे. नक्षलींच्या ‘बुलेट राज’ला ‘बॅलेट’द्वारे उत्तर देऊन लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी या मतदारसंघातील जनता उत्सुक आहे.


नेहमीप्रमाणे यंदाही माओवाद्यांनी गडचिरोलीत लोकसभा निवडणुकीला विरोध केला आहे. नागरिकांनी मतदान प्रक्रियेत भाग घेऊ नये म्हणून माओवाद्यांकडून ठिकठिकाणी फलक लावण्यात येत आहेत. परंतु मागील अनुभव पाहता प्रशासन नक्षलींचा सामना करण्यास सज्ज झाले आहे. त्यांच्या दहशतीला भीक न घालता जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात मतदानात सहभागी होत असल्याचा मागील काही निवडणुकांत अनुभव येत आहे. 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत गडचिरोली मतदारसंघात 65.14 टक्के इतके मतदान झाले होते, हे विशेष.


गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील तीन, चंद्रपूर जिल्ह्यातील दोन आणि गोंदिया जिल्ह्यातील एक अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांनी येथे बाजी मारली होती.


त्यांच्या विजयात माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भाजपचे माजी आमदार अशोक नेते यांनी कोवासेंना चांगली लढत दिली होती. यंदा भाजपने अशोक नेते यांना पुन्हा संधी दिली आहे.


अंतर्गत मतभेदाचा काँग्रेसला फटका
2009 च्या निवडणुकीनंतर कोवासे आणि वडेट्टीवार यांचे फाटले. या दोघांमधील वादाचा फटका काँग्रेसला बसला व मागील चार वर्षांत जिल्ह्यात पक्षाला मोठे नुकसान झाले. पालिका व जि.प. निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही अशोक नेते यांनी जनसंपर्क कायम ठेवला. परिणामी नगरपालिका आणि जि.प. निवडणुकीत त्यांना फायदा झाला.


संवेदनशील केंद्रांवर पोलिसांची बारीक नजर
गडचिरोलीत 1,791 मतदान केंद्रे आहेत. अतिसंवेदनशील, संवेदनशील आणि साधारण अशा विभागणी केली आहे. भामरागड, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, चिचगड हे तालुके अतिसंवेदनशील तर धानोरा, कोरची, कुरखेडा, चामोर्शी हे तालुके संवेदनशील आहेत. तर गडचिरोली, वडसा, आरमोरी हे तालुके साधारण गटात मोडतात. या केंद्रांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.


बसपाच्या उमेदवारांवर काँग्रेस- भाजपचे लक्ष
काँग्रेसच्या एका गटाने यंदा कोवासेंच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे काँग्रेसने गडचिरोलीचे तिकीट वडेट्टीवारांचे समर्थक आमदार नामदेव उसेंडी यांना दिले. सध्याची परिस्थिती पाहता भाजपला रोखण्यासाठी कॉँग्रेस नेत्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागेल. मागील निवडणुकीत बसपातर्फे राजे सत्यवानराव आत्राम यांनीही दीड लाख मते घेतली होती. यंदा बसपाकडून डॉ. रमेश गजबे यांचे नाव चर्चेत आहे. गैरआदिवासी मतदारांचा कल डॉ. गजबे यांच्या बाजूने असून ते निवडणूक रिंगणात उतरले तर भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात. तर अहेरीचे अपक्ष आमदार दीपक आत्राम यांनी आदिवासी विद्यार्थी संघातर्फे देवरी येथील श्रीधर सिडाम यांना उमेदवारी दिली आहे. आत्राम आणि वडेट्टीवार यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे सिडाम यांच्या उमेदवारीने काँग्रेसची अडचण वाढली आहे.


2009 चा अनुभव पोलिसांच्या पाठीशी
2009 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान माओवाद्यांनी गडचिरोलीत अनेक कारवाया घडवून आणल्या. त्या वर्षभरात एकूण 52 पोलिस शिपाई शहीद झाले होते. हा अनुभव पाहता गडचिरोली पोलिसांनी यंदा विशेष काळजी घेतली आहे. सध्या गडचिरोलीत महाराष्‍ट्र पोलिसांचे 5 हजार, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 5 हजार आणि राज्य राखीव पोलिस दलाचे 1 हजार असे 11 हजार सैनिक तैनात आहेत. याशिवाय गडचिरोली पोलिस प्रशासनाने 5 हजार जादा जवानांची मागणी केली आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणूक काळात माओवाद्यांचे डाव हाणून पाडण्यासाठी 1 हजार 600 सैनिक गडचिरोलीत तैनात करण्यात येतील, अशी माहिती गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली.